संशोधकांनी नवीन रक्तचाचणी विकसित केली असून यामुळे स्मृतिभ्रंश असणाऱ्या रुग्णांमध्ये या आजाराचे निदान लवकर होत असल्याचे आढळून आले आहे. या चाचणीमुळे या संदर्भातील नवीन औषधांच्या निर्मितीसाठी चालना मिळण्याची शक्यता असल्याचे जर्मनीतील ऱ्हुर विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये लक्षणांच्या सुरुवातीला अमायलॉइड बीटाचा थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्ताच्या चाचणीमध्ये इम्युनो इन्फ्रारेड सेन्सर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमायलॉइड बीटा थराचा आकार आणि त्याची रचना समजून घेतली जाते. या चाचणीमुळे स्मृतिभ्रंश आजाराचे निदान लवकर होत असल्याचे दिसून येते, असे मॉलिक्युलर सेल नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निरोगी व्यक्तीच्या मेंदूतील अमायलॉइड बीटाचा थर पातळ असतो, तर स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीच्या मेंदूमधील अमायलॉइड बीटाचा थर जाड आणि चिकट असतो. त्यामुळे तो वेगळा ओळखता येतो आणि निदान करता येते. या दोन्ही प्रकाराचे थर अवरक्त किरण वेगवेगळ्या प्रकारे शोषून घेतात. ही बाब रोगनिदानासाठी उपयोगी ठरते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 2:59 am