पिझ्झा खाणे म्हणजे लठ्ठपणास आमंत्रण देण्यासारखे असते. आहार म्हणून तो शरीरास उपायकारक नव्हे तर अपायकारक आहे, असे सांगणाऱ्यांना शास्त्रज्ञांनी धक्का दिला आहे. पिझ्झातील काही अन्नघटक ‘नोरोव्हायरस’ या विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करीत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. त्यामुळे पिझ्झाप्रेमींना आपली रसना तृप्त करता येणार आहे.
अरायझोना विद्यापीठातील केली ब्राईट यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ‘नोरोव्हायरस’वर कसे नियंत्रण ठेवता येईल यावर संशोधन करीत होते. त्यावेळी पिझ्झासाठी वापरण्यात येणाऱ्या वनस्पतींमध्ये असलेल्या ओरेगॅनोील ‘कॅरव्हॅक्रॉल’ हा घटक या विषाणूविरोधात प्रभावी ठरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याच घटाकमुळे, या वनस्पतीस विशिष्ट गंध आणि चव प्राप्त होत असल्याचेही या संशोधनात त्यांना आढळले. आणि ‘कॅरव्हॅक्रॉल’ या विषाणूच्या बाह्य़कवचाचा भेद करीत असल्याचे त्यांनी टिपले.

उपयुक्त निरीक्षण
‘कॅरव्हॅक्रॉल’  हा घटक अन्नस्वच्छक तसेच पृष्ठभाग स्वच्छक म्हणून उपयुक्त असतो. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे असून सूक्ष्मजीवाणूंविरोधात तो अत्यंत प्रभावी ठरू शकतो. आणि म्हणून उंदरांमधील ‘नोरो’ विषाणूवर डॉ. ब्राईट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कॅरव्हॅक्रॉल’चे प्रयोग करून बघितले. त्यानंतर, पुढे आलेली निरीक्षणे अत्यंत उपयुक्त होती. या प्रयोगांती विषाणूच्या बाधेत एका तासात १० हजार पट कपात झाल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे नोरोव्हायरस?
ब्रिटनमध्ये विशेषत हिवाळ्यात हा विषाणू आढळतो. या विषाणूची लागण झाल्यास मोठय़ा प्रमाणात उलटय़ा होतात आणि त्यातून या विषाणूचा संसर्ग होत जातो. या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यास पिझ्झातील काही घटक उपयुक्त असल्याचे नव्या संशोधनात पुढे आले.