डॉ. अमिता आठवले

हिवाळ्यातील गारठा सुखद वाटणारा असला तरी अ‍ॅलर्जी, अस्थमा, दमा आदी श्वसनाचे आजार या काळात डोके वर काढू लागतात, मग थंडी नकोशी वाटायला लागते. योग्य काळजी आणि वेळेत उपचार घेतले तर थंडीचा गारवा अनुभवण्याची संधी नक्कीच मिळू शकते.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

बदलत्या ऋतुमानानुसार पर्यावरणातील जैविक व रासायनिक घटक बदलतात. थंडीत तापमान कमी होते आणि आकाशात धुक्याऐवजी धूरमिश्रित आच्छादन तयार होते. त्याखाली लपलेल्या थरात तरंगते धुलिकण आणि नायट्रोजन वायूची संयुगे आदी श्वसनदाह निर्माण करणारे घटक आपल्या अवतीभवती पसरतात. आणि मग सृष्टीचे ‘कौतुक’ सांगणारा आणि ‘नेमेचि’ प्रदूषणाची पातळी खाली आणणारा पावसाळा संपून मार्गशीर्षांतल्या हिवाळ्याचे स्वागत ‘अ‍ॅलर्जीक’ सर्दीने करायची वेळ येते.

अ‍ॅलर्जी

अ‍ॅलर्जी म्हणजे नेमके काय, याचे कोडे सध्या उपलब्ध असलेल्या नैदानिक चाचण्यांमधून सुटत असले तरी हवेतील ज्या घटकामुळे ही होते, त्या ‘अ‍ॅर्लेजन्स’वर १०० टक्के प्रतिबंधक औषधे मात्र अजूनही उपलब्ध नाहीत. काही अ‍ॅलर्जी प्रतिबंधक औषधे ५० टक्के सर्दी आणि दम्याच्या आजारावर परिणामकारक आहेत. त्यामुळे अ‍ॅलर्जीच्या आजारांमध्ये औषधांसोबतच काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात तरंगत्या धुलिकणांचे प्रमाण काही विभागात मानक पातळीच्या दुप्पट दिसते. यात बऱ्याच वेळा त्या विभागातल्या कारणांनुसार तरंगत्या धुलिकणातील घटक अवलंबून असतात. उदा. कचराभूमीच्या सभोवताली अस्परजीलस बुरशी असलेले धुलिकण अधिक दिसून आले. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटचे कण अधिक प्रमाणात असतात. मुख्य किंवा वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्याजवळ कार्बनमोनॉक्साईडचे प्रमाण हवेत अधिक असते. त्यामुळे अशा ठिकाणी वावर करणाऱ्या लोकांनी विशेषत: श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. धुळीची अ‍ॅलर्जी असलेल्यांनी आपले अंथरूण-पांघरूण आठवडय़ातून एकदातरी स्वच्छ धुवावे, उशीचा अभ्रा, गादीवरची चादर तसेच पांघरूण यात दडलेली धूळ ही थेट नाकात जाऊन शिंकांना आमंत्रण द्यायला वेळ लागत नाही. घरातील स्वच्छता ही धूळ न उडेल या पद्धतीने केल्यास अधिक उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ ओल्या फडक्याने पुसणे अथवा व्हॅक्यूम क्लिनर वापरणे. काठीला फडका बांधून त्याने धूळ झटकणे शक्यतो टाळावे. जीवनशैलीतील अनेक बदलही हे आजार बळावण्यापासून रोखू शकतात. जसे की सुका आणि ओला कचरा वर्गीकरण, कृत्रिम धाग्यांच्या अंथरूणाऐवजी सुती गोधडय़ांचा वापर आदी दैनंदिन जीवनात सुधारणा करूनही अनेक चांगले परिणाम होऊ शकतात.

बाहेरच्या हवेतील प्रदूषण घरात येऊ  नये म्हणून काही वेळेस एअर प्युरिफायरचा वापर केला जातो. त्याची निवड मात्र घराच्या खोलीनुसार, क्षेत्रफळाकरिता योग्य अशी हवी. त्यातील बदलाव्या लागणाऱ्या फिल्टरची योग्य निगराणी राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु बाहेरची हवा अत्यंत अशुद्ध झाली तर मात्र घरातही त्रास जाणवण्याची शक्यता असते. मुंबईसारख्या शहरात जागोजागी चाललेल्या रस्त्याच्या व इतर बांधकामामुळे धुळीचे प्रमाण अधिक दिसून येते. तेव्हा वातावरणात धूळ निर्माण करणाऱ्या बाबींवर नियंत्रण आणणेही अधिक गरजेचे आहे.

इनहेलरचा वापर

श्वसनाचे आजार असलेले रुग्ण इनहेलर पंपाची सवय लागेल या भीतीने याचा वापर करणे टाळतात. अ‍ॅलर्जिक सर्दी-दम्याच्या त्रासावर नियंत्रण आणण्यासाठी इनहेलरचा वापर करणे या दिवसांत गरजेचे आहे. इनहेलरच्या माध्यमातून नेमके औषध श्वसननलिकेत सोडले जाते आणि हवेतील अ‍ॅर्लेजन श्वसनमार्गात रुतण्याचे मार्ग हे औषध बंद करते. या पद्धतीने उच्छ्वासाची गती आणि फुप्फुसक्षमता कायम राखायला मदत होते आणि अधिक आराम पडतो.

प्रतिबंधात्मक लस

वयपरत्वे प्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी आवश्यक पेशी निर्माण करणाऱ्या थायमस ग्रंथीची वाढ थांबते आणि जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढते. जंतुसंसर्ग टाळण्याकरिता ६५ वर्षांवरील श्वसनाचा आजार असलेल्या व्यक्तींसाठी आता प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी दरवर्षी थंडीच्या दिवसांत आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांच्या सल्ल्याने ही लस टोचून घेणे फायदेशीर आहे. ऋतूबदलामुळे होणारा त्रास यामुळे कमी होतो.

प्रतिबंधात्मक उपाय

घरात हवा खेळती राहणे आवश्यक आहे. समोरासमोर खिडक्या उपलब्ध असल्यास त्या खुल्या ठेवाव्यात. स्वयंपाकघरात एक्झॉस्ट पंखा असावा. काही वेळेस आवाज जास्त असल्याने वापर केला जात नाही. घरात धूर निर्माण करेल, अशा बाबी टाळाव्यात. सकाळी हवा थंडीत अधिक प्रदूषणयुक्त असते. त्यामुळे शक्यतो बाहेर जाऊन व्यायाम करणे टाळावे. थंडीत श्वसनमार्गाच्या स्नायूंचे व्यायाम केल्यास फुप्फुसक्षमता उत्तम राखायला निश्चित मदत होते. घरच्या घरी करता येण्यासारखे प्राणायाम, सूर्यनमस्कार यांसारखे व्यायामानेही अधिक आराम पडतो. ऋतूबदलाप्रमाणे नियंत्रणात्मक औषधे वेळेवर घ्यावीत. अनेकदा रुग्ण त्रास होत नाही म्हणून औषधे घेणे टाळतात. त्रास होईपर्यंत वाट न बघता औषधांचे नियमित सेवन करावे. श्वसनाच्या आजारासोबत मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यासही त्याचीही औषधे वेळत घेणे आवश्यक आहे.

धुळीच्या वातावरणात जाण्याची आवश्यकता भासल्यास ‘एन ९५’ प्रकारचे मास्क वापरावेत. त्यामुळे धुळीचा भपक्यामुळे होणारा त्रास टाळता येतो. विडी, सिगारेट आदी व्यसनांची तल्लफ थंडीत अधिक वाटत असली तरी ती टाळणेच उत्तम!

आहारात बदल

या ऋतूत मिळणारी विविध रंगांची नैसर्गिक फळे व भाज्या ही आवश्यक जीवनसत्त्वांचा खजिना ठरतात. कृत्रिम फळांचे रस, शीतपेय मात्र टाळणे उत्तम! कृत्रिम रंग आणि स्वाद श्वसनमार्गात ‘अ‍ॅलर्जिक’ त्रास निर्माण करू शकतात. श्वसनमार्गाची प्रतिकारशक्ती कायम राखण्यात जीवनसत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. अ, ब, क, ड आणि ई  ही सर्व जीवनसत्त्वे प्रतिकारशक्तीवर्धक असून यांचा आवर्जून आहारात समावेश करावा. प्रथिनांचा समावेश असणेही महत्त्वाचे आहे. मोड आलेली कडधान्यांचा वापर करावा. यामध्येही बाजारात उपलब्ध असलेले अधिक लांब मोड आलेले धान्य वापरू नयेत. यामध्ये प्रथिनांची क्षमता कमी असते. धूरमिश्रित धुक्यामुळे सूर्यप्रकाशात तयार होणारे ‘ड’ जीवनसत्त्व हे पुरेसे मिळत नाही. त्यामुळे गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य मात्रेमध्ये औषधे घेण्यास हरकत नाही.

शरीरातील आद्रता

थंडीच्या दिवसांत हवेतील आद्र्रता कमी होते आणि घसा अधिक कोरडा पडतो. श्वसनमार्गातील आद्र्रता कायम राखण्याकरिता पुरेसे पाणी पिणे हे थंडीतही गरजेचे आहे. एक किलो वजनाकरिता साधारण ५० मिलीलिटर पाणी म्हणजेच उदाहणार्थ ६० किलो वजनाच्या माणसाला दिवसाला ३ लिटर पाण्याची आवश्यकता असते. शरीरात आर्द्रतेचे प्रमाण योग्य राखल्यास श्वसनमार्गात तयार होणारा कफ घट्ट होत नाही. किडनी किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी मात्र डॉक्टरी सल्ल्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवावे. पाण्यासोबतच शरीरातील आर्द्रता राखण्यासाठी गवती चहा पाण्यात उकळवून तो प्यावा, तसेच टोमॅटो अथवा इतर भाज्यांचे सूप करून घ्यावे.