News Flash

स्वयंपाकघरातून रिटायर व्हा

स्वयंपाकघरात, संसारात न रेंगाळता बाहेर पडा.

मोह बाजूला सारा आणि  आपणहून ज्येष्ठ नागरिकांच्या घरात राहायला या.

वाचक लेखक
रेखा केळकर – response.lokprabha@expressindia.com

स्वयंपाकघर हे स्त्रीच्या पाचवीला पुजलेले आहे. घरात स्त्रीने स्वयंपाक केलाच पाहिजे असा, अलिखित नियम आहे. शिवाय कित्येक वर्षांची परंपरा स्त्रीने ‘चूल आणि मूल’ करावे. पण एखादीला स्वयंपाकाची आवडच नसली तर..? पूर्वी अशा आधुनिक विचारांच्या स्त्रिया नव्हत्या; पण आत्ता..? शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे खेडय़ापाडय़ातील स्त्रियाही शिकू लागल्या. अशिक्षित आईपण मुलीच्या शिक्षणाला पाठिंबा द्यायला लागली. शहरातील मुली तर उच्चशिक्षित व्हायला लागल्या.  त्यामुळे त्यांना खूप वाचन, अभ्यास करावा लागला. मग स्वयंपाकाकडे कोण बघतो?  मुलींचा एकच उद्देश असतो की, मी कसे जास्तीत जास्त गुण मिळवून पहिली-दुसरी येऊ?

‘संसार आणि नोकरी’ या दोन्ही आघाडय़ा सांभाळायला तारेवरची कसरत करावी लागे स्त्रीला. म्हणून शाळेत नोकरी करून सुट्टय़ा पदरात पाडत असत. पण शरीरच ते! थकायला व्हायचे; तरी बाहेरून डबा/जेवण आणणे मनाला पटायचे नाही आणि खिशाला परवडायचे नाही. बदल हा हळूहळू घडत असतो. परदेशात नवरा-बायकोला मदत करतो. त्यामुळे भारतातही ही प्रगती झाली. जमेल तेवढी मदत नवरा नोकरीवाल्या बायकोला करू लागला. त्यामुळे कामाची विभागणी आपसूकच झाली. परंतु स्वयंपाक मात्र स्त्रीनेच करायचा. तिला आवड असो वा नसो!

ज्यांना स्वयंपाकाची किंवा एखादा पदार्थ सर्वाना खाऊ घालायची आवड आहे, त्या कुठेही पदार्थ करून सर्वाकडून वाहवा मिळवतात. पण.. ज्यांना मुळीच स्वयंपाकाची आवड नाही, त्यांनी काय करावे? व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच. तेव्हा समजूतदारपणा कोणी (सासू की सून) दाखवायचा? आपला अहंकार बाजूला ठेवून सुनेला मदत केली तर..? लोकांना काय बोलायचे ते बोलू द्यावे. याकरता सासूने खंबीर असले पाहिजे.

आजकाल पावलोपावली ‘पोळी-भाजी’ केंद्रे आहेत. डबा आणून देणाऱ्या बायका आहेत. पण रोज बाहेरचे थोडेच चालते? तीच चवढव खाऊनही कंटाळा येतो. म्हणजे प्रत्येक स्त्रीला वरण-भाताचा कुकर लावता आला पाहिजे आणि पोळी-भाजी करता आलीच पाहिजे. ‘घरचे ते घरचे आणि दारचे ते दारचे’ असा गैरसमज आहे, त्याला काय करावे बरे? जोडीला एक नवीन पदार्थ बनवला, तरी घरच्यांना जेवण आवडते. तोंडी लावणे – चटणी, लोणचे, कायरस, भरीत घरचे असले; तरी जेवणाची रंगत वाढते,  म्हणे! म्हणजे काय तर स्त्रीने स्वयंपाक घरात डोकावलेच पाहिजे.

आता माझ्या एका जवळच्या मैत्रिणीची कहाणी सांगते. उच्चशिक्षित असल्यामुळे वाचनाची आणि अभ्यासाची आवड; त्यामुळे ढुंकूनही स्वयंपाकघरात बघायची नाही. आई कानकपाळी ओरडायची की लग्न झाल्यावर माझा उद्धार होईल. जरा तरी शिकून घे; पण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. अचानक लग्न ठरले. मग काय? पण आव्हान स्वीकारणे तिचा धर्म असल्यामुळे हळूहळू पुस्तकात बघून आणि टीव्हीवर बघून एक-एक पदार्थ करू लागली. नवरा आणि मुलांना सुग्रास अन्न नाही; पण भुके ठेवायचे नाही, हे ठरवले. रोज नवनवीन भाज्या, आमटय़ा करू लागली. तसेच वेगवेगळे पदार्थही शिकू लागली. प्रयत्नाअंती परमेश्वर असतोच ना? इतकंच काय पाहुण्यांना बोलावल्यावर तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करायची. पाहुणे तृप्त झाले आणि स्तुती केली जेवणाची की भरून पावायची. नंतर लोणची पण शिकली. शाकाहारी नंतर मांसाहारीही स्वयंपाक करायला लागली. म्हणजे इच्छा तेथे मार्ग मिळतोच ना?

..परंतु आता ती ज्येष्ठ नागरिक झाली तरी तिचे पालुपद तेच आहे की मला स्वयंपाकाची आवड नाही. एकदा कोणाकडे तरी गेले असताना एक जण म्हणाला, आम्ही निवृत्त होतो, तसेच बायकांनीही स्वयंपाकघरातून निवृत्त व्हायला पाहिजे.’ तिला ते वाक्य इतके आवडले की काही विचारू नका; पण नवरोजींचा पाठिंबा नव्हता; त्यामुळे मूग गिळून गप्प बसावे लागले. म्हातारपणात काय संसार मोडायचा? रेटत होती. झाले!

चिंता सोडून चिंतन केले की मार्ग मिळतोच. माझ्या खास मैत्रिणीने मार्ग शोधला म्हणजे सापडला. किती वर्षे संसारात गुरफटून राहायचे? ‘येणे-जाणे-करणे’ आलेच. स्वत:ची आवडनिवड निवांतपणे कधी जपायची? तणाव नसावा, उत्स्फूर्त जीवन कसे जगावे? झोप काय किंवा आनंद काय विकत घेता येत नाही; त्यामुळे पैशांची मिजास मारायची नाही. खास मैत्रिणीने वृद्धाश्रम न बघता ज्येष्ठ नागरिकांची घरे बघायला सुरुवात केली आणि महद्आश्चर्य म्हणजे पंचतारांकित ज्येष्ठ नागरिकांची घरे (म्हणजे एका इमारतीतच) सापडली. आणि आता आपले छंद जोपासत दिवस आनंदात घालवते आहे. काही म्हणजे काही करावे लागत नाही – इकडची काडी तिकडे सरकवावी लागत नाही. एकत्र राहून एकांतात राहते. जेवणखाणं आयते, चहा-नाश्ता आयता. बहारच आहे जीवनाला.

शेवटी जी काही पाच-दहा वर्षे राहिली आहेत, ती आनंदात घालवायला, घर सोडायला काय हरकत आहे? विहिरीत किती दिवस राहणार? जरा बाहेरच्या जगात येऊन उघडय़ा डोळ्यांनी आस्वाद घ्या. लोकांच्या म्हणण्याकडे अक्षरश: दुर्लक्ष करा. आनंद आपल्या आतच असतो; पण तो बाहेर काढावा लागतो. स्वयंपाकघरातच फक्त आनंद मिळतो असे नाही. वातावरण बदलले की सर्व छान वाटते. त्यामुळे तब्येतही छान राहते. डोक्याला कसलाच त्रास नसल्यामुळे शरीरही साथ देते. बरे नसल्यावर डॉक्टर, मॅनेजर आणि मैत्रिणी धावून येतात; त्यामुळे मानसिक समाधानही मिळते.

घरात राहिलात की लाजेकाजेस्तव तरी थोडे काम करावे लागते. एकदा का ज्येष्ठ नागरिकांच्या घरात आला की सकाळ-संध्याकाळ फिरण्याचे काम व्यवस्थित होईल. समाजसेवा करायची असेल; तर तीही जेवढी झेपेल तेवढी करता येईल. मनाजोगते वागता येईल. आजकाल नवनवीन औषधांमुळे वयोमर्यादा वाढली आहे. वयामुळे कधी ना कधी आजारी पडायलाच होते; तेव्हा घरच्यांना सेवा करायला वेळ कुठे असतो; अगदी इच्छा असली तरी! तेव्हा स्वयंपाकघरात, संसारात न रेंगाळता बाहेर पडा. मोह बाजूला सारा आणि  आपणहून ज्येष्ठ नागरिकांच्या घरात राहायला या.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 5:30 pm

Web Title: retirement communities and senior housing
Next Stories
1  जाणून घ्या कसे निवडावे योग्य क्रेडिट कार्ड   
2 गुगल ड्राईव्हवरही राहणार नाही आता व्हॉट्स अॅपचा डेटा सुरक्षित
3 चार कॅमेरे आणि 8 GB रॅम, OPPO चा नवा स्मार्टफोन
Just Now!
X