18 January 2018

News Flash

आनुवंशिकतेमुळे स्किझोफ्रेनिया होण्याचा धोका

स्किझोफ्रेनिया होण्याचा धोका हा जवळपास ८० टक्के आनुवंशिक आहे.

पीटीआय, लंडन | Updated: October 7, 2017 6:07 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

स्किझोफ्रेनिया होण्याचा धोका हा जवळपास ८० टक्के आनुवंशिक आहे. तो पालकांच्या जनुकांमधून मुलांमध्ये जातो, असे नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटले आहे. स्किझोफ्रेनिया ही एक गंभीर मनोविकृती असून, यामध्ये वागणुकीत बोलण्या-चालण्यात आणि विचारात विचित्र बदल दिसून येतात. यातील बरीच लक्षणे अगदी हळूहळू दिसायला लागतात.

जैविक मनोचिकित्सा या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये स्किझोफ्रेनिया आजारा होण्याचा धोका हा आनुवंशिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आनुवंशिकतेमुळे स्किझोफ्रेनिया होण्याबाबतचे हे नवीन संशोधन असून, यामध्ये जवळपास ७९ टक्के धोका हा आनुवंशिकतेमुळे निर्माण होत आहे. मागील अभ्यासांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त असल्याचे, संशोधकांनी सांगितले. मागील अभ्यासामध्ये स्किझोफ्रेनिया आजार होण्यामध्ये आनुवंशिकता कारणीभूत असल्याचे प्रमाण ५० ते ७० टक्के होते.

कोपनहेगन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासामध्ये १८७० पासून डेन्मार्कमध्ये जन्म घेतलेल्या जवळपास ३० हजार जोडप्यांचा आणि  त्यांच्या त्यांच्या मुलांचा अभ्यास केला. यामध्ये स्किझोफ्रेनिया आजार होण्यास आनुवंशिकता कारणीभूत असल्याचे प्रमाण ७३ टक्केपेक्षा अधिक आढळून आले. या अभ्यासासाठी त्यांनी नवीन पद्धत वापरली होती.

जैविक कारणे या आजारात अत्यंत महत्त्वाची आहेत. यामुळेच आनुवंशिकतेचा घटक अधिक महत्त्वाचा ठरतो. आज वैद्यकीय शास्त्रात या रोगाला कारण ठरणारी काही जनुकेसुद्धा शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत. मेंदूतील डोपामीन या रसायनाला कमी करण्यासाठी अ‍ॅन्टी सायकॉटिक्स औषधे दिली जातात. यामुळे स्किझोफ्रेनियाची लक्षणे हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते, असे संशोधकांनी सांगितले.

First Published on October 7, 2017 6:07 am

Web Title: risk of developing schizophrenia due to hereditary
  1. No Comments.