कामाच्या ठिकाणी अतिशय शांत, उत्साहपूर्ण, खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्नशील असतात. त्याचा त्यांना मोठय़ा प्रमाणात फायदाही होत असतो. मात्र एखाद्या कामाच्या ठिकाणी छळ किंवा हिंसाचाराचा प्रयत्न करण्यात येतो, त्याठिकाणी टाइप दोनचा मधुमेह वाढण्याचा धोका निर्माण होतो. कार्यालयातील वातावरणामुळे चयापचयामध्ये झालेले बदल आणि अवेळी खाण्याची सवय मधुमेह होण्यास कारणीभूत ठरते, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.

नोकरीमध्ये असलेली असुरक्षितता, कामाच्या वाढलेल्या वेळा याचा सतत मानसिक परिणाम होत असतो. ही स्थिती मधुमेह होण्यास कारणीभूत ठरते, असे मागील अभ्यासात नोंदविण्यात आले होते.

नव्या संशोधनामध्ये कामाच्या ठिकाणी सतत छळवणूक करणे आणि हिंसा यामुळेही मानसिक परिणाम होत असून, स्वत:विषयीचे मत आणि क्षमता प्रभावित होतात.

कामाच्या ठिकाणी छळवणूक करण्यामुळे गंभीर सामाजिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात. यामुळे शरीराच्या जैविक प्रक्रियेमध्ये बदल झाल्याने मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो, असे डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे.

ताण आल्यामुळे संप्रेरकांमध्ये बदल होतात, त्यामुळे आजारांची निर्मिती होण्यास सुरुवात होते. चयापचय क्रियेतील झालेले बदल आणि लठ्ठपणा यामुळे मधुमेहास आंमत्रण मिळते. कामाच्या ठिकाणी छळ झाल्यास मनामध्ये नकारात्मक भावना तयार होते तसेच खाण्याच्या सवयीही बदलतात. संशोधकांनी यासाठी कामांच्या ठिकाणी होत असलेला छळ आणि मधुमेह याचा परस्पर संबंध आहे का याचा संशोधकांनी अभ्यास केला.

डायबेटोलॉजिया या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनामध्ये १९ हजार २८० पुरुष आणि २६ हजार ६२५ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. कामाच्या ठिकाणी छळ आणि हिंसा होत असेल तर मधुमेहास आंमत्रण मिळत असल्याचे या अभ्यासात दिसून आले.