बाळाच्या दुर्मीळ आनुवंशिक रोगावर उपचार करण्यासाठी शरीरात प्रत्यारोपण करता येणारा लघू यंत्रमानव (रोबो) संशोधकांनी विकसित केला आहे. अमेरिकेतील हार्वर्ड वैद्यकीय विद्यालय आणि बॉस्टन बाल रुग्णालय येथील संशोधकांनी शरीरात प्रत्यारोपण करता येणाऱ्या लघू यंत्रमानवाचा नमुना तयार केला आहे. हा यंत्रमानव एक लहान उपकरण आहे जे अन्ननलिकेला दोन कडय़ांनी जोडता येते. त्यानंतर यंत्रमानवामध्ये लावलेले गतिप्रेरक हळुवारपणे उतींमधील पेशी खेचण्याचे काम करते. हा यंत्रमानव दोन प्रकारचे सेन्सर वापरतो. उतींमधील ताण मोजण्यासाठी आणि तर दुसरे सेन्सर उतीचे विस्थापन मोजण्याचे काम करते. उतींच्या गुणधर्माप्रमाणे यंत्रमानव निरीक्षण करीत उतींना खेचण्याचे काम करतो. या यंत्रमानवाचे कार्य हे स्नायूंचा अभाव दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फोकर तंत्रावर आधारित आहे. उतींना अशा प्रकारे खेचल्यामुळे त्यांची वाढ होण्यास मदत होत असल्याचे कळल्यामुळे अनेक डॉक्टर फोकर तंत्राचा वापर करीत आहेत असे शेफिल्ड विद्यापीठाच्या डॅना डॅमियन यांनी म्हटले. परंतु उतींची वाढ करण्यासाठी किती प्रमाणात बल वापरावे हे अद्याप अस्पष्ट आहे. आम्ही विकसित केलेल्या लघू यंत्रमानवाकडून किती बल लावले जावे याचे मोजमाप केले जाते त्याचप्रमाणे यात उपचारादरम्यान गरजेनुसार बदलदेखील करता येतात, असे डॅमियन यांनी सांगितले. या यंत्रमानवाचे शरीरात प्रत्यारोपण शक्य असल्याने एक डॉक्टर पूर्णवेळ तुमच्यावर उपचार करीत असून त्यात गरजेनूसार बदल करीत असल्याप्रमाणे आहे. आझोफेगल अ‍ॅट्रेसिया हा एक दुर्मीळ आनुवंशिक रोग आहे. अमेरिका आणि युरोपमधील चार हजारांतील एका बाळाला हा रोग असतो. या रोगात अन्ननलिकेचा वरचा भाग आणि खालचा भाग जोडला गेला नसतो त्यामुळे अन्न पोटात पोहोचत नाही.