रॉयल एनफील्डच्या नव्या Classic 500 Pegasus Edition बाइकच्या ऑनलाइन बुकींगला कालच (बुधवारी) सुरूवात झाली होती आणि उल्लेखनिय म्हणजे अवघ्या तीन मिनिटांपेक्षाही कमी वेळेत या बाइकच्या सर्व युनिट्सची विक्री झाली. कंपनीकडून भारतामध्ये या बहुप्रतिक्षित बाइकच्या 250 युनिट्सची विक्री होणार होती. तर जगभरात एकूण 1 हजार युनिट्सची विक्री होत आहे. २५ जुलै २०१८ रोजी संध्याकाळी ४ वाजता यासाठी ऑनलाइन विक्री सुरू झाली, आणि विक्री सुरू होताच केवळ १७८ सेकंदांमध्येच ही बाइक ‘आउट ऑफ स्टॉक’ झाली. 2.40 लाख रुपये(एक्स शोरुम) इतकी या गाडीची किंमत आहे.

रॉयल एनफील्ड RE/WD 125 (Flying Flea)च्या प्रेरणेतून Royal Enfield Classic 500 Pegasus Edition या बाइकची निर्मीती करण्यात आली आहे. पूर्वी फ्लाइंग फ्ली(Flying Flea) या नावानेही या बाइकला ओळखलं जायचं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश पॅराट्रूपर्स फ्लाइंग फ्लीचा वापर करायचे.

रॉयल एनफील्डने या नव्या बाइकमध्ये अनेक अॅक्सेसरीज दिल्या आहेत. प्रत्येक बाइकच्या पेट्रोलच्या टाकीवर एक वेगळा सिरियल नंबर देण्यात आला आहे. बाइकमध्ये ब्राउन कलरचे हॅंडलबार ग्रिप्स, लेदर स्ट्रॅपसह एअर फिल्टर ब्रास बकल्स यांचा समावेश आहे. याशिवाय हेडलाइट बेजल, पॅडल, किकस्टार्ट लीवर आणि रिम्स यांचाही समावेश आहे. पावर जनरेट करण्यासाठी 499सीसी, सिंगल सिलेंडर, एअर कुल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 27.2 बीएचपी पावर आणि 41.3 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. इंजिनमध्ये 5 स्पीड ट्रांसमिशन गिअर बॉक्स आहे. सस्पेन्शनसाठी या बाइकमध्ये टेलेस्कॉपिक फॉर्क्स आणि ट्विन शॉक्स आहे. 194 किलो इतकं या बाइकचं वजन आहे.