बुलेटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रॉयल एनफील्ड या कंपनीने नुकतीच एक विशेष घोषणा केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या कंपनीने आपली नवीन तंत्रज्ञानाने विकसित बाईक लवकरच लाँच होणार असल्याचे जाहीर केले आहे. बुलेटची हवाच काही वेगळी, ही गाडी म्हणजे एकप्रकारची शानच. या गाडीचा लूक आणि त्याचा भारदस्तपणा यामुळे त्यावरुन फिरणे हे आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळाच लूक देऊन जाते. आता यामधील नव्या बदलामुळे ही गाडी चालवणे आणखी सोपे होणार आहे. कंपनीने आपली ही गाडी इलेक्ट्रीत बनवणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. याबाबतचे काम सुरु असून २०२० पर्यंत कंपनी आपली इलेक्ट्रीक रॉयल एनफील्ड बाजारात दाखल करेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

सध्या बाजारात वेगवेगळ्या बाईक्स इलेक्ट्रीक स्वरुपात येत असताना आपलीही बाईक इलेक्ट्रीक असावी या विचाराने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पाहूयात काय आहे या इलेक्ट्रीक बाईकची खासियत. या बाईकमध्ये बॅटरी पॅक असेल असे कंपनीने सांगितले आहे. २०२० च्या ऑटो एक्स्पोमध्ये ही बाईक प्रदर्शित करण्यात येईल. आता इलेक्ट्रीक असल्याने या बाईकची किंमतही जास्त असणार याबाबत शंकाच नाही. ही किंमत अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे बोलले जात आहे. क्रूजरमुळे कंपनीची ब्रँड इमेज टिकून राहीली आहे. बुलेट आणि थंडरबर्डनंतर सर्वात जास्त विकले जाणारे हे मॉडेल आहे.

सध्या बाजारात एमफ्लक्स १ ही इलेक्ट्रीक बाईक काहीशी प्रसिद्ध आहे. एकदा चार्ज केल्यावर ही गाडी २०० किलोमीटरचे अंतर पार करते. या गाडीला टक्कर देण्याचे आव्हान नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रीक रॉयल एनफील्डमध्ये असेल. हार्ली डेविडसनमध्ये असणारे काही तंत्रज्ञान या नव्या इलेक्ट्रीक रॉयल एनफील्डमध्ये वापरण्यात येईल. ही बाईक य़शस्वी झाल्यास याच धर्तीवर कंपनी येत्या काळात आपल्या अन्य बाईकही लाँच करण्याची शक्यता आहे.