Royal Enfield ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सेवा सुरू केली आहे. करोना महामारीमुळे ज्या ग्राहकांना जवळच्या वर्कशॉपमध्ये जाऊन सर्व्हिसिंग करणं शक्य नाही अशांसाठी कंपनीने ‘सर्विस ऑन व्हील्स’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. यानुसार ग्राहकाच्या घरी जाऊन बाइक सर्व्हिसिंगची सेवा दिली जाणार आहे.

कंपनीने ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ या सेवेसाठी खास 800 मोटरसाइकल्स देशाच्या विविध डीलरशिप्समध्ये तैनात ठेवल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कंपनीने संपर्कात न येता खरेदीला चालना देण्यासाठी ऑनलाइन बाइक बूकिंग सेवाही सुरू केली आहे. ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ सेवेनुसार एक मोबाइल सर्व्हिस टीम ग्राहकाच्या घरी जाईल आणि बाइकची पूर्ण सर्व्हिसिंग करेल. या टीमकडे टूल किटसोबत गरज भासल्यास बदलण्यासाठी ओरिजनल स्पेअर पार्ट्सदेखील असतील.

कशी वापरायची सर्व्हिस? :-
कंपनीची मोबाइल टीम बाइकच्या सर्व्हिसिंग लहान-मोठं रिपेअरिंग, इलेक्ट्रिकल दोष, पार्ट्स बदलणं किंवा दुरूस्ती यांसारखी कामं करेल. साधारणपणे ही टीम 80 टक्क्यांपर्यंत सर्व प्रकारची सर्व्हिसिंग करेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी Royal Enfield च्या ग्राहकांना जवळच्या डीलरशिपमध्ये फोनद्वारे संपर्क करावा लागेल. त्यानंतर सर्व्हिसिंगसाठी वेळ आणि दिवस सांगितल्यानंतर मोबाइल टीम घरी येऊन तुमच्या बाइकची सर्व्हिसिंग करेल.