चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Royole ने आपल्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनवरुन पडदा हटवलाय. कंपनीने Royole Flexpai 2 हा फोल्डेबल स्मार्टफोन आणला असून हा कंपनीचा दुसरा फोल्डेबल फोन आहे. बुधवारी एका ऑनलाइन इव्हेंटद्वारे कंपनीने हा फोन लाँच केला. भारतीय बाजारात सॅमसंग आणि मोटोरोला यांसारख्या ब्रँड्ससोबत Royole Flexpai 2 ची स्पर्धा असेल.

कंपनीने सर्वप्रथम 2018 मध्ये Royole Flexpai हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आणला होता. पण, हा फोन कंपनीने केवळ चिनमध्येच लाँच केला होता. त्या फोनची पुढील आवृत्ती असलेल्या Royole Flexpai 2 या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात थर्ड जनरेशन फ्लेक्सिबल फोल्डेबल डिस्प्ले (Third-Generation Cicada Wing Fully Flexible Display) देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 7.8 इंचाचा असून 4:3 च्या रेशोने फोल्ड होतो. याशिवाय कंपनीने स्मार्टफोनमध्ये LPDDR5 RAM आणि पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिलाय. तसेच फोनमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसोबत मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअपही आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये ट्रू स्टीरिओ स्पीकरचा वापर केला आहे. पण कंपनीने या फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स अद्याप शेअर केलेले नाहीत. ब्राइटनेसच्या बाबतीत या फोनमध्ये दिलेला डिस्प्ले हा अन्य कोणत्याही फोल्डेबल स्मार्टफोनपेक्षा उत्तम असल्याचा दावा कंपनीने केलाय.

अँड्र्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असलेल्या Royole Flexpai 2 स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही. पण, या स्मार्टफोनची किंमत Royole FlexPai च्या किंमतीइतकी किंवा थोडीफार कमी-अधिक असण्याची शक्यता आहे. Royole FlexPai ची किंमत लाँचिंगवेळी किंमत 1600 डॉलर (जवळपास 1,21,700 रुपये) इतकी ठेवण्यात आली होती. दुसऱ्या तिमाहीमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे.