पोंगलनिमित्त साबुदाण्याचे लाडू केले जातात. पोंगल शब्दाचा तमिळ भाषेतील अर्थ भरभराट असा आहे. चार दिवस चालणाऱ्या या सणात दुसऱ्या दिवसाला खूप महत्व असते. तर जाणून घेऊया ‘साबुदाणा लाडू’ची पाककृती.

साहित्य –

साबुदाणा – १ कप
बारीक किसलेले सुके खोबरे – ३/४ कप
साखर – अर्धा कप
काजू – १० ते १५
वेलची – ५
साजूक तूप – ७ चमचे

कृती –

प्रथम एक भांडे गरम करून त्यात मंद आचेवर ३० मिनिटापर्यंत साबुदाणा परतून घ्या. २५ ते ३० मिनिटानंतर साबुदाण्याचा रंग हलका तपकीरी होईल. गॅसवरून साबुदाणा खाली उतरवून थंड होऊ द्या. साबुदाणा थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या. साबुदाणा थंड होईपर्यंत पुन्हा गॅसवर भांडे गरम करण्यासाठी ठेऊन, त्यात मंद आचेवर २ ते ३ मिनिटासाठी सुक्या खोबऱ्याचा बारीक कीस परतून घ्या. किसाचा रंग तपकिरी होण्याची गरज नाही. परतलेला कीस गॅसवरून उतरवून बाजूला सारून ठेवा. आता साखर मिक्सरमधून फिरवून घेऊन तिची पावडर करून घ्या. परतून घेतलेल्या खोबऱ्याच्या किसात मिक्सरमधून काढलेली साखर आणि साबुदाण्याची पावडर घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. दुसऱ्या एका भांड्यात एक चमचा साजूक तुपात काजुचे बारीक तुकडे परतून घ्या. नंतर वेलचीची पूड करून घ्या. लाडवाच्या मिश्रणात परतलेले काजूचे तुकडे आणि वेलचीची पूड घालून मिश्रण चांगले एकत्र करा. उरलेले तूप भांड्यात घालून गरम करून घ्या. गरम केलेले तूप लाडवाच्या मिश्रणात घालून, चमच्याने चांगले एकत्र करून घ्या. लाडूचे मिश्रण थंड होताच लगेच लाडू वळायला घ्या.