10 August 2020

News Flash

सुरक्षित मातृत्व

पतीला दुसरे लग्न करायचे असले तर तो पत्नीच्या अंतिम संस्कारांना हजर राहू शकत नाही.

गर्भवतीचं आरोग्य या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायची गरज आहे. कारण गरोदरपणातील मातामृत्यू हा आजही आपल्याकडे मोठा प्रश्न आहे.

मी मुंबईच्या उपनगरीय रुग्णालयात निवासी डॉक्टर होते तेव्हाचा एक प्रसंग आठवणींत घर करून आहे. एक रुग्ण महिला एक्लेम्प्सिआ नावाच्या एका गंभीर आजाराने दगावली. पती न्यायला आला नाही, कारण त्या समाजातील प्रथांनुसार  पतीला दुसरे लग्न करायचे असले तर तो पत्नीच्या अंतिम संस्कारांना हजर राहू शकत नाही. कुटुंबीयांनी नवजात मुलीलासुद्धा घरी नेले नाही. तिला आमच्या रुग्णालयातील परिचारिकांनी निदान दोन महिने सांभाळल्याचे चांगलेच आठवते.

त्या वेळेस  सगळ्याच परिस्थितीचा राग आला होता आणि नराश्य जाणवले  होते. आता जेव्हा मातामृत्यू होतात तेव्हा काळजी वाटते, एक सेन्स ऑफ अर्जन्सी जाणवते, असे होता नये हे प्रकर्षांने वाटते. सुरक्षित गर्भारपण आणि सुरक्षित प्रसूती हा प्रत्येक स्त्रीचा मूलभूत अधिकार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५ सालच्या आकडेवारीप्रमाणे दरदिवशी जगभरात  ८३० मातामृत्यू होतात. यातील बहुतेक टाळण्यासारखे असतात. पण त्या स्त्रीच्या आरोग्यासाठी जबाबदार कोण?  नवरा, सासर, माहेर की ती स्वत:? आरोग्यसेवा, सरकार, डॉक्टर? मालक कोण? मूल कोणाचं? वंशाचा दिवा, पणती वगरे  कोणाचे? ते जबाबदार नाहीत का? आरोग्यसेवा अपुऱ्या पडत असल्या तर सरकारी यंत्रणा जबाबदार; पण त्यांचा योग्य तो आणि योग्य तेव्हा लाभ घेणे नक्कीच आपल्या हातात आहे की नाही?

आजही, ओ.पी.डी.त आणि इमर्जन्सीत, आधी कधीच कुठेही आरोग्य तपासणी न केलेल्या गरोदर महिला अगदी शेवटच्या क्षणी आणल्या जातात. त्यांतल्या अनेकजणी तर बाहेरगावाहून नुकत्याच आलेल्या असतात. आता हे प्रमाण कमी होत आहे, पण ते शून्यावर आले पाहिजे.  नवीन ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सव्‍‌र्हे’ या वर्षी प्रकाशित होईल तेव्हा आपल्या समाजातील  कौटुंबिक आरोग्याचा लेखाजोखा बाहेर पडेलच. २००५-६ च्या सव्‍‌र्हेनुसार गरोदरपणात निदान तीन आरोग्यतपासण्या झालेल्या स्त्रियांचे प्रमाण ग्रामीण महाराष्ट्रात ६५ टक्के व शहरी भागांत ८६ टक्के होते.

याची कारणे म्हणजे गरिबी, अज्ञान, अनास्था आरोग्य सुविधांचा अभाव, आणि सामाजिक चालीरीती! पूर्वी गरोदर सुनेला सातव्या महिन्यात चांगलासा दिवस पाहून माहेरी पाठवत आणि ओटी भरण्याचा समारंभ केला की आईवडील मुलीला डॉक्टरकडे नेत. आमच्या रुग्णालयात खास करून सोमवार आणि गुरुवार, पाठोपाठ मंगळवार आणि शुक्रवार असा क्रम होता. देवदेवतांना आपण वार वाटून दिले आहेत ना! सर्वमान्य पवित्र वारी ही भली मोठी रांग असायची, शनिवारी आणि बुधवारी एकदम लाइट काम! म्हणून त्या वाराचे निवासी डॉक्टर मित्र-मत्रिणी  खूश असत. रांगेतसुद्धा फक्त बायाबापडय़ा आणि त्यांच्या सासवा, आया, मावश्या दिसत. नवरे नाहीच. मात्र आता हे चित्र बरेच बदलले आहे, जागरूकता वाढली आहे.

बदलत्या काळात विशेषत:, विभक्त कुटुंबात पत्नीच्या तपासण्या, इलाज, डॉक्टरांच्या भेटी या सगळ्यात पुरुष मोठय़ा प्रमाणात सहभागी होताना आढळतात, समुपदेशनासाठी येतात. सोनोग्राफी, डिलिव्हरीसाठीसुद्धा येतात. सरकारी कर्मचारी पुरुषांना पत्नीच्या प्रसूतीसाठी रजेचा लाभ मिळतो.

प्रसारमाध्यमांचा मोठा प्रभाव आजच्या दाम्पत्यांवर पडला आहे. दूरदर्शनवरील जाहिराती, इंटरनेटवर येणारी माहिती जवळजवळ सर्वानी वाचलेली असते. त्यामुळे कधी कधी शंका, भीती, तणावही उत्पन्न होतात, पण तसे होण्याचे कारण नाही. प्रत्येक माहितीचा अन्वयार्थ परिस्थितीनुसार लावायचा असतो.

शिल्पा शेट्टी या प्रथितयश सिनेनटीने केलेल्या जाहिरातीनंतर अनेक जणी घरीच गरोदरपणाची खात्री करून घेण्यासाठी लघवीची तपासणी करून पाहतात. त्यात वावगं काही नाही, पण त्यानंतर शारीरिक तपासणी मात्र करून घ्यावीच.

पहिल्या दोन-तीन महिन्यांत प्रसूतीपूर्व तपासणी केल्याने अनेक फायदे होतात. शरीरात गरोदरपणात खूप बदल होत असतात. हृदयविकार, आकडी, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार, त्यांवरील औषधे यांचा गर्भवती स्त्री आणि गर्भाची वाढ यांच्याशी असलेला संबंध आपण पाहिला आहेच. त्यातील काही आजारांत हे होणारे शारीरिक बदल (उदाहरणार्थ हृदयाच्या झडपांचा आजार ) जीवघेणे ठरू शकतात. त्यासाठी वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे, तपासण्या करणे आणि इलाज चालू करणे आवश्यक आहे.

साधारणत: प्रत्येक निरोगी गरोदर स्त्रीच्या – हिमोग्लोबिन, रक्तगट, थायरोइड, रक्तशर्करा, लघवी,  एच.आय.व्ही. हिपेटायटिस बी., सी.,  व्ही.डी.आर.एल.च्या तपासण्या केल्या जातात. सोनोग्राफी होते, लसीकरण केले जाते. फॉलिक अ‍ॅसिड नावाच्या फार महत्त्वाच्या जीवनसत्त्वाचे सेवन पहिल्या महिन्यापासून करण्याचा डॉक्टर सल्ला देतात. तीन महिने संपले की, लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. त्या दोन्ही गोळ्या एकत्र घ्यायच्या नसतात. लोहाच्या (आयर्न)च्या गोळ्या खाण्याबरोबर किंवा खाण्यानंतर घेतल्यास लोह शरीरात शोषले जात नाही.

गर्भाच्या सोनोग्राफीबद्दल सर्वच आई-वडिलांना उत्सुकता आणि कुतूहल असते. इवलाले धडधडाणारे हृदय, हलणारे हात-पाय, बाळाचे बोट चोखणे, कोलांटउडी मारणे पाहायला कोणाला आवडणार नाही? एक प्रचलित समज आहे की सोनोग्राफी ही अगदी साधी, शंभर टक्के  सुरक्षित तपासणी आहे. वास्तविक सोनोग्राफीचे शास्त्र जरी साठ वष्रे जुने असले तरी त्याच्या संपूर्ण शंभर टक्के सुरक्षिततेबद्दल शास्त्रही ग्वाही देत नाही. तपासणी फक्त वैद्यकीय सल्ल्याने आणि आवश्यक तेव्हाच करून घ्यावी. याशिवाय भ्रूणिलग चिकित्साविरोधी कायदे एवढे कडक आहेत की डॉक्टरांना प्रत्येक तपासणी आता सरकारदप्तरी नोंदावी लागते.

पहिली सोनोग्राफी साधारणत: दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात करतात. पण पाळी चुकली आणि रक्तस्राव झाला तर लगेच डॉक्टरकडे जावे. कधीतरी गर्भनलिकांच्या काही विकारांमुळे गर्भ नलिकेतच मूळ धरतो आणि वाढतो. याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. ही नलिका गर्भाशयासारखी जास्त मोठी तर होऊ शकणारच नाही ना! मग ती फुटते आणि पोटातच रक्तस्राव होऊन जीव जाऊ शकतो. अशा गर्भधारणेची शक्यता असली तर सोनोग्राफीने त्याबद्दल शंकानिरसन करता येते. टेस्ट टय़ूब प्रेग्नन्सी असल्यास रक्तस्राव झाल्यास ही तपासणी आवश्यक असते.

असे मानले जाते की जसे आईचे वय वाढते तसे गर्भात गुणसूत्रीय दोष निर्माण होण्याची शक्यता वाढते. पस्तिशीतल्या स्त्रियांमध्ये गर्भाला डाउन्स सिण्ड्रोमचा धोका असतो. त्यासाठी विशिष्ट रक्ततपासण्या व अकरा ते तेरा आठवडय़ांत सोनोग्राफी करावी लागते.  पाचव्या महिन्यात बाळाची अवयवांतील व्यंग वगरे पाहण्यासाठी तपशीलवार सोनोग्राफी होते.  वारेची स्थिती पाहिली जाते. सुरुवातीला महिन्या महिन्याला, सातव्या महिन्यापासून पंधरवडय़ाला आणि नवव्या महिन्यात दर आठवडय़ाला डॉक्टर तपासणीला बोलावतात.

बाळाची वाढ योग्य होते आहे की नाही हे नियमित तपासणी, वजन पाहून कळते. तपासणीत, रक्तदाब, पोटतपासणी, पायावरील सूज, रक्त कमी (एनिमिया) आहे का, बाळाची स्थिती, हृदयाचे ठोके तपासले जातात.

सगळ्याच समाजांमध्ये गरोदर अवस्था आणि प्रसूतीबद्दल अनेक समज/ गरसमज असतात. रूढी, प्रथा यांना नावे ठेवण्याचा अथवा आव्हान द्यायचा इथे हेतू नाही. पण अपायकारक आणि उपद्रवकारक रूढी कोणासाठीही बऱ्या नाहीत. इतरांच्या दृष्टीने पुढारलेल्या मानल्या जाणाऱ्या एका विशिष्ट समाजात गरोदर स्त्रीला नऊ महिने केस धुण्यास बंदी आहे. घाम येत असेल तर म्हणे डोक्यात चंदनाची पूड घालून केस िवचरायचे!  माझी एक मत्रीण काही तरी निमित्त सांगून आपल्या मत्रिणीकडे जात असे आणि  केस धुऊन कोरडे करून मग घरी परतत असे. आहाराबद्दलसुद्धा अनेक समज असतात. माझे सगळ्या मत्रिणींना सांगणे असे आहे की वडीलधारी मंडळी नेहमी सगळे प्रेमापोटीच सांगत असतात. त्यांच्या आपुलकीचा अपमान न करता, सुवर्णमध्य साधावा. आमच्या अ‍ॅलोपथीत गरम, थंड असा आहार मानला जात नाही.  पण तूप वगैरे भरपूर खाल्ले, सुकामेवा खाल्ला की बाळ खूप सुदृढ जन्मते असे नाही.

पचेल असा आहार घ्यावा. प्रोजेस्टेरोन हे प्रेग्नन्सीतील हॉर्मोन आतडय़ांची हालचाल मंद करते. आम्लता वाढते, ढेकर येतात, बद्धकोष्ठ (पोट साफ न होणे ) होते. म्हणून आहारात फायबर  (भाज्या, फळे, कडधान्ये)चा भरपूर समावेश करावा. कच्च्या सलाड/ भाज्या स्वच्छ धुवून मगच खाव्यात. पचत असेल तर आवडीचे मांसाहारी जेवण जरूर घ्यावे. पण ते काळजीपूर्वक स्वच्छ करून व्यवस्थित शिजवले असल्याची खात्री करूनच खावे. गरोदरपणात कावीळ (हिपेटायटिस) होणे खूप धोकादायक आहे. म्हणून बाहेर उघडय़ावरचे पदार्थ खाणे टाळावे. पाणी स्वच्छ आणि उकळून, गाळून प्यावे. मद्यपान पूर्णत: टाळावे. मधुमेह, हृदयविकार, मूत्रिपडाचा विकार, स्थूलता या त्रासांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहार घ्यावा.

एक न विचारला जाणारा, पण प्रत्येकीच्या मनातील प्रश्न म्हणजे गरोदरपणात लैंगिक संबंध (सेक्स करणे) धोकादायक असतात का? सगळे काही व्यवस्थित चालले असले तर लैंगिक संबंध धोकादायक नसतो. त्यामुळे गर्भपात होत नाही. गर्भपात होण्याची कारणे प्रत्येक केसमध्ये आणि गर्भकाळात वेगवेगळी असतात. ती आपण पुढे पाहूच. या अवस्थेत काही जणींचा लैंगिक संबंधातील रस कमी होतो. शेवटच्या काही महिन्यांत कंबरदुखीमुळे, शरीर अवघडलेले असल्यामुळे लैंगिक संबंध नकोसा वाटतो. तुमच्या विशिष्ट परिस्थितीत अथवा इच्छेनुसार डॉक्टरी सल्ला घेऊन या दिवसांतही हा आनंद उपभोगू शकता. गरोदरपणात रक्तस्राव झाला असल्यास, वार (प्लासेण्टा) खाली असल्यास, अकाली प्रसूती (प्रीमॅच्युअर डिलिवरी) ची शक्यता दिसत असल्यास मात्र लैंगिक संबंध टाळावा.

आजकालच्या स्त्रियांच्या दृष्टीने करिअर खूप महत्त्वाचे असते. मग त्यासाठी नोकरी करताना प्रवास टाळता येत नाही. रजा मिळत नाही. अशा वेळी आपल्या कार्यस्थळीचे नियम आणि आपली तब्येत यांचा योग्य विचार करून निर्णय घेतल्यास पश्चात्ताप करायची पाळी येणार नाही. असे अजूनही अनेक प्रश्न आणि गरोदरपणातील धोक्याच्या लक्षणांबद्दल  पुढील भागात पाहू.
डॉ. पद्मजा सामंत
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 1:12 am

Web Title: safe motherhood
टॅग Mother
Next Stories
1 मसाले
2 आईच्या दुधापासून प्रतिजैविक तयार करण्यात यश
3 थुंकणाऱ्यांवर आता कडक कारवाई ; राज्य विधिमंडळात लवकरच विधेयक?
Just Now!
X