रोजच्या साचेबद्ध आयुष्यातून काही निवांत क्षणांच्या शोधात असणाऱ्यांच्या संख्येत हल्ली बरी वाढ होत आहे. आयटी म्हणू नका, मार्केटिंग म्हणून नका किंवा इतर कोणतं कलात्मक क्षेत्र म्हणू नका. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या हल्लीच्या तरुणाईचा कल फिरण्याकडे तसा जास्तच दिसून येतो. कोणी सोबत असेल तर त्यांच्या साथीने आणि कोण नसेल तर एकट्यानेच भटकंतीसाठी निघत एका नव्या प्रवासाची अनेकजण सुरुवात करतात. यामध्ये एकट्याने किंवा गर्ल गॅंगच्या साथीने फिरणाऱ्या मुलींची संख्या तुलनेने जास्त आहे ही बाबही लक्षात घेण्याजोगी आहे.

परदेशात एकट्याने फिरायला जाण्यापेक्षा भारतातच काही ठिकाणांचं सौंदर्य अनुभवत स्वच्छंद फिरण्याचा अनुभव घेण्याऱ्या अनेक मैत्रीणी हल्ली पाहायला मिळतात. चला तर मग नजर टाकूया मुलींच्या दृष्टीने फिरण्यासाठी सुरेख, सुरक्षित आणि तितक्याच सोयीच्या काही पर्यटन स्थळांवर…

वाचा : प्रवासखर्च कमी करण्याच्या सोप्या टिप्स

कच्छचे रण-
कच्छचे रण म्हणजे सध्याच्या घडीला अनेक पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण. पांढरीशुभ्र वाळू आणि डोक्यावर असणारं आभाळ या सर्व गोष्टींमध्ये रमणाऱ्या गर्ल गॅंगची संख्याही काही कमी नाही.

लक्षद्वीप-
स्कुबा डायव्हिंग, स्नोर्कलिंग आणि कायाकिंगसाठी लक्षद्वीप हा एक उत्तर पर्याय आहे. निळाशार समुद्र आणि त्यातूनच आपल्याला साद घालणारा सुरेख निसर्ग अनेक सोलो बॅकपॅकर्सना आकर्षित करतो.

सिक्कीम-
सहसा काही ठराविक ठिकाणं वगळली तर एकट्या मुलींना फिरण्यासाठी पाठवताना कुटुंबियांना काळजी लागून राहते. सुरक्षेच्या दृष्टीने वाटणारी ही काळजी स्वाभाविक आहे. पण, तरीही काही ऑफबिट ठिकाणी जाऊन सुट्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या मैत्रिणींसाठी सिक्कीम हा एक उत्तम पर्याय आहे. ट्रेकवेड्या काही मैत्रीणींसाठी इथला गोएचा ला किंवा त्झोंगिरी ट्रेकही खऱ्या अर्थाने परवणी ठरतो.

दार्जिलिंग-
टॉय ट्रेन, चहाचे मळे आणि कधीही न संपणारी निसर्गाची लीला या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी बऱ्याच मुलीं उत्सुक असतात. त्यातही कंचनजंगाचं सौंदर्य समोरुन अनुभवण्यासाठीसुद्धा भटकंतीसाठी निघणाऱ्या मैत्रीणींची संख्या काही कमी नाही.

पाँडिचेरी-
गर्ल गँगला कल्ला करण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे पाँडीचेरी. पोर्तुगीज संस्कृतीची सुरेख झलक पाहण्याची संधी इथे आल्यावर मिळते. शांत समुद्रकिनारा, तितकच शांत वातावरण आणि मनाचा ठाव घेणारं स्थानिकांचं प्रेम या गोष्टी पाँडीचेरीमध्ये आल्यावर पर्यटकांचं मन जिंकतात.

अंदमान बेट-
समुद्राच्या पोटात दडलेल्या सुरेख आणि अविश्वसनीय विश्वाची अनुभूती घ्यायची असेल तर अंदमान- निकोबार बेटांना भेट देण्याच्या पर्याया अनेकजण पसंती देतात. फोटोवेड्या मैत्रीणींसाठीसुद्धा हे ठिकाण म्हणजे एक परवणीच आहे.