अजय महाडिक

पावसाळ्यात पाण्यातून वाहन पुढे नेणे आव्हानच असते. अनेकदा ते बंद पडते, त्यानंतर उडणारी तारांबळ, वेळेवर कोणतीही मदत न मिळणे हे सर्व टाळता येऊ शकते. यातून काही बाबी लक्षात ठेवल्या आणि आपल्या वाहनामध्ये काही उपकरणेवजा उपयोगाच्या वस्तू ठेवल्यास पावसाळ्यात होणारे नुकसान व फजितीपासून आपण स्वत:ला वाचवू शकतो. याबाबात सीएसटी रोड, कुर्ला परिसरांतील वाहन तंत्रज्ञ तौसिफ शेख कपाडिया व वाहन व्यावसायिक अमिन शेख यांनी केलेले मार्गदर्शन.

पावसाळ्यात बऱ्याचदा रस्त्यावर अणकुचीदार वस्तू वर आल्याने किंवा इतर कारणांनी टायर फुटण्याच्या घटना वाढतात. अशा वेळी टायर फुटलेल्या दिशेने वाहन घसरण्यास सुरुवात होते. पाठीमागचे टायर फुटल्यास वाहन नागमोडी चालते. अशा वेळी सुकाणू चक्रावरील (स्टेअिरग व्हिल) हाताची पकड घट्ट करावी व वाहन रस्त्यावर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. घसरण्याच्या उलटय़ा दिशेला सुकाणू चक्र फिरवण्याचा मोह टाळावा. सावधपणे ब्रेक लावावा व वाहन शक्यतो रस्त्याच्या कडेला उभे करावे.

पावसाळ्यात अपघातास कारणीभूत ठरणारी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ब्रेक्स निकामी होणे. याची कारणे म्हणजे ‘मास्टर ब्रेक सिलिंडर’ निकामी होणे, ‘ब्रेक फ्लुइड पाइप’ फाटणे, प्रमाणापेक्षा  कमी ‘ब्रेक ऑइल’ असणे, यामुळे किंवा ब्रेक गरम झाल्यामुळे ते निकामी होतात. अशा वेळी पायातली कळ सतत खालीवर (पम्पिंग) करत राहावी. गिअरवर वाहनाचा वेग नियंत्रित करत वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन थांबविण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता वाटल्यास हॅण्डब्रेकचा वापर करावा. हेडलाइट्स चालू  करावेत. सतत हॉर्न वाजवून वाहतुकीतील इतर वाहनांना  योग्य तो इशारावजा संकेत देत वाहन सुरक्षित मार्गावर ठेवावे. वाहन तरी नियंत्रित होत नसल्यास रिव्हर्स गिअरचा वापर करावा. त्यामुळे पाठीमागची चाके बंदिस्त होऊन वेग नियंत्रित होईल. या कृतीमुळे वाहनाची वाहनक्षमता (ट्रान्समिशन) बिघडते, परंतु आणीबाणीच्या प्रसंगी ते नुकसान परवडते.

 

या परिस्थितीत काय कराल?

१) पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या रस्त्यावर अगदी हळुवार व कमी अ‍ॅक्सिलरेटर (वेगवर्धक) देऊन वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करा. या कृतीने कार बंद न पडता पाण्यातून सहज जाता येऊ शेकते.

२) पावसात वाहनाचा ब्रेक निकामी झाल्यास इंजिन चालू करण्याचा प्रयत्न करू नये. या वेळी गाडी धक्का मारून रस्त्याच्या किनारी अथवा सुरक्षित ठिकाणी न्या. पावसात अडकल्यावर वाहनाचे इंजिन सुरू करण्याच्या व्यर्थ प्रयत्नात ते बंद होण्याचा धोका असतो आणि तसे झाल्यास विमा कंपनीकडून त्या संबंधीचा धावा फेटाळला जातो.

३) वाहन पाण्यात असताना वातानुकूलित यंत्रणा बंद करा. खिडक्या थोडय़ा उघडय़ा. जर वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवल्यास इंजिनामध्ये वेगाने पाणी जाऊ शकते.

४) जर पाण्याची पातळी चाकाच्या वर गेल्यास गाडी बंद करून त्वरित बाहेर पडणे सुरक्षेसाठी आवश्यक ठरते.

हे उपयोगाचं ठरेल..

पावसाळ्यात दूरच्या प्रवासाला निघताना काही गोष्टी सोबत असल्यास अडचणीच्या काळात त्या उपयोगाच्या ठरतात. त्यावर एक कटाक्ष- दोरी

पावसाळ्यात वाहन वेगवेगळ्या कारणांनी खराब होऊ शकते. अशा वेळी  कारमध्ये एक मोठी आणि मजबून दोरी असणे गरजेचे आहे. एकाद्या ठिकाणी गाडी बंद पडल्यास तिला दुसऱ्या वाहनाच्या मदतीने ओढण्यासाठी ती

उपयोगाची ठरते.

‘यूएसबी’ आणि ‘पॉवरबँक’

दूरची यात्रा करताना आपल्याजवळ ‘यूएसबी’ आणि ‘पॉवरबँक’ सोबत असणे जरुरीचे आहे. अनेकदा असे होते की आपण मदतीसाठी मोबाइल उचलतो तेव्हा बॅटरी डिस्चार्ज झालेली असते. पावसाळ्यातील प्रवासात असा निश्काळजीपणा महागात पडू शकतो.

विजेरी

हे आजच्या काळात सहसा कुणी जवळ बाळगत नाही, कारण प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये फ्लॅश लाइट असते. पण विचार करा रात्रीच्या वेळी एखाद्या निर्जनस्थळी गाडी बंद पडली आणि दुरुस्तीसाठी प्रकाशाची  गरज असेल तेव्हा फ्लॅश लाइटपेक्षा विजेरी जास्त उपयोगी पडते. कारण तिची दृष्यता तुलनेने जास्त चांगली असते.

प्रथमोपचार संच

आपल्या वाहनात प्रथमोपचार संच अवश्य ठेवा. आणि हो त्यातील औषधे कालबाह्य़ ( अेक्स्पायर) झाली नाहीत याची खात्री करून घ्या. याशिवाय आपल्याला दमा, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार असल्यास त्या संबंधीची औषधेही सोबत जरूर ठेवा.

लुब्रिकंट

पावसाळ्यात आपल्या वाहनाच्या बोनेटपासून गाडीच्या दारापर्यंत लुब्रिकंट(वंगण)चा वापर आवश्यक असतो. त्यासाठी पावसाळ्यात वाहनाची देखभाल करताना आवश्यक भागात लुब्रिकंटची फवारणी करून घ्यावी. कारण उघड-झाप होणाऱ्या भागात गाडी सुरू झाल्यावर विविध आवाज येतात.

डोअर विझर्स

पावसाळ्यामध्ये डोअर विझर्स खूप उपयोगी पडतात. बऱ्याचदा पावसाळ्यात आपल्या विंडस्क्रीनवर ओलावा वाढतो. अशा वेळी बाहेरच्या हवेला आवागमनासाठी (क्रॉस वेंटिलेशन) दरवाज्याच्या व्हिजर्ससह आपण खिडक्या दोन इंच खाली करू शकतो. यामुळे आपल्या विंडस्क्रीनवर आद्र्रता निर्माण होण्यास तसेच आपल्या कारमध्ये पाऊस येण्यास प्रतिबंध होता.

प्लास्टिकचे जाजम (फुटमॅट)

पावसाळ्यात वाहनात बसताना व उतरताना पाणी आत येते. त्यामुळे आतील कापडी  जाजम (मॅट) खराब होते. यावर उपाय म्हणजे प्लास्टिकचे जाजम (फुटमॅट) यामुळे पावसाच्या पाण्यापासून वाहन बऱ्यापैकी सुरक्षित होईल. तसेच पाण्यामुळे वाहनाच्या खालच्या पत्र्याला गंजही लागणार नाही.

रेन रिपेलंट ग्लास क्लिनर

पावसाळ्यात बऱ्याचदा आपण वाहनाच्या

काचा व आरसे पुसतो, मात्र ते करूनही आपल्याला बाहेरचे दृश्य पाहताना तेवढी स्पष्टता येत नाही. अशा वेळी आपण ‘रेन रिपेलंट क्लिनर’चा वापर केल्यास काचेवर पावसाचे थेंब टिकणार नाही व चांगली दृश्यमानता मिळेल.