20 January 2018

News Flash

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा

डोळ्यांची योग्य ती काळजी घ्यायला हवी

डॉ. जाई केळकर, नेत्रतज्ज्ञ | Updated: August 8, 2017 2:39 PM

कधी कोणी डोळ्याला नंबर आहे म्हणून तर कोणी फॅशन म्हणून लेन्स वापरतात. मात्र डोळ्यामध्ये काढ-घाल कराव्या लागणाऱ्या या लेन्स वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. काहींना या लेन्स सूट होत नाहीत आणि मग डोळ्याला खाज येणे, चुरचुरणे, डोळे लाल होणे, पापण्यांना सूज येणे अशा समस्या उद्भवतात. मात्र या त्रासापासून बचाव करण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सविषयी योग्य पद्धतीने समजून घेणे आणि योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

डोळे हा आपला एक दागिनाच असतो. स्त्रिया आपले डोळे आणखी सुंदर दिसावेत यासाठी काजळ, आय लायनर यांचा वापर करतात. परंतु ही सौंदर्यप्रसाधने वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे सौंदर्यप्रसाधने चांगल्या गुणवत्तेची असणे गरजेचे असते. त्याशिवाय रात्री झोपताना डोळे योग्य पद्धतीने साफ होणेही आवश्यक असते.

१. कॉन्टॅक्ट लेन्सचे फिटींग बघून घ्यावे. कपड्याच्या फिटींगप्रमाणे हे फिटींग असल्याने आपल्या डोळ्याला सूट होईल अशाच लेन्सची निवड करावी. आजकाल कस्टमाईज्ड कॉन्टॅक्ट लेन्स मिळतात.

२. कॉन्टॅक्ट लेन्समध्ये दररोज, आठवड्याला किंवा महिन्याला बदलण्याच्या लेन्स उपलब्ध असतात. मात्र सगळ्याच लेन्सची योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्यावर काही घाण बसणार नाही, काढ-घाल करताना त्या खाली पडणार नाहीत हे पहावे लागते.

३. माझा चष्म्याचा नंबर विचित्रच आहे. त्यामुळे मला लेन्स मिळणार नाहीत अशी तक्रार अनेकजण करताना दिसतात. मात्र सिलेंड्रीकल आणि बायफोकल अशा दोन्ही लेन्स बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे एकाहून जास्त ठिकाणी चौकशी करुन पाहावी.

४. कॉन्टॅक्ट लेन्सच्या वापराने डोळे खराब होतात असा काहींचा समज असतो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यास त्याचा काहीही त्रास होत नाही. मात्र यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आठ ते नऊ तासांपेक्षा जास्त वेळ लेन्स वापरणे योग्य नाही. आठवड्यातून एक दिवस लेन्सला सुटी द्यावी. कोणत्याही कारणाने डोळे लाल झाले असतील तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरु नयेत.

५. पोहताना कॉन्टॅक्ट लेन्स घातल्या असतील तर गॉगल घालायलाच हवा. अन्यथा डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते.

६. कॉन्टॅक्ट लेन्स झोपताना चुकूनही डोळ्यात ठेऊ नयेत. लेन्स घालताना आणि काढताना हात स्वच्छ असतील याची काळजी घ्यावी. हाताला लागलेले काहीही लेन्सला लागले आणि ते डोळ्यात गेल्यास त्रास होतो.

७. लेन्सचे सोल्यूशन काहीसे महाग असते. त्यामुळे ते कमी प्रमाणात वापरणे किंवा जुनेच पुन्हा पुन्हा वापरणे असे प्रकार केले जातात. मात्र दर एक दिवसानी हे सोल्यूशन बदलणे गरजेचे आहे.  एखादेवेळी सोल्यूशन नसेल तर लेन्स पाण्यात ठेऊयात असा विचार काहीवेळा केला जातो. मात्र पाण्यात लेन्स ठेवल्याने त्या खराब होतात.

 

डॉ. जाई केळकर, नेत्रतज्ज्ञ

First Published on August 8, 2017 2:39 pm

Web Title: safety tips for using contact lenses how to take care
  1. No Comments.