तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या दर दिवसाला नवीन तंत्रज्ञानाचा मोबाईल बाजारात उपलब्ध होत आहे. सँमसंग कंपनीही यामध्ये मागे नाही. सुरुवातीला फिचर फोन होता. त्यानंतर मागच्या काही वर्षांत स्मार्टफोनचे प्रमाण वाढले. त्यातही रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेराचे रिझोल्यूशन याबाबत ग्राहकांकडून विशेष विचारणा होऊ लागली. आता यामध्ये आणखी प्रगती झाली असून दोन फ्रंट कॅमेरा असणारे फोन बाजारात आले आहेत. सॅमसंग इंडियाने गॅलक्सी A8 प्लस हे आपले नवीन मॉडेल नुकतेच लाँच केले. त्यामध्ये अशाप्रकारे दोन फ्रंट कँमेरे देण्यात आले आहेत. हा हॅंडसेट नुकताच व्हिएतनाम येथे लाँच करण्यात आला. सॅमसंग गॅलक्सी A8 प्लस हा फोन सध्या फक्त अॅमेझोनवर उपलब्ध असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

भारतात सुरूवातीला या फोनची किंमत ३२,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची भारतातील किंमत पाहता तो वनप्लस 5T,नोकिया 8, गूगल पिक्सल 2 आणि LG G6 यांसारख्या स्पर्धक नव्याने बाजारात आलेल्या मोबाईलला टक्कर देईल. हा हॅँडसेट इनफिनिटी डिस्प्ले डिझाईन आणि वॉटर डस्ट-रेसिस्टेंट बॉडी सहीत मिळेल. गॅलक्सी A8 प्लस मध्ये एक ६ इंच फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. इनफिनिटी डिस्प्ले पॅनलच्या सेफ्टीसाठी गॅलक्सी S8 आणि गॅलक्सी S8 प्लस प्रमाणे ग्लास आहे. यामध्ये ऑक्टाकोअर प्रोसेसर वापरण्यात आला असून हा फोन ४ जीबी आणि ६ जीबी अशा रॅममध्ये उपलब्ध आहे.

या फोनचा रिअर कॅमेरा १६ मेगापिक्सलचा असून फ्रंट कॅमेराही १६ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. याशिवाय ८ मेगापिक्सलचा आणखी एक फ्रंट कँमेरा कंपनीने दिला आहे. या दोन्ही कॅमेरांनी सेल्फी काढता येणार आहे. त्याचबरोबर बॅकग्रॉऊंडला ब्लर इफेक्ट देखील देऊ शकतात. सॅमसंग गॅलक्सी A8 प्लसची ६४ जीबी मेमरी असून २५६ जीबी एक्स्पांडेबल मेमरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 4G LTE,वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय यात ३५०० मिलीअॅम्पियर्स पॉवरची बॅटरी देण्यात आली आहे.