दक्षिण कोरियाची आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने आपल्या ब्रिटनमधील स्मार्टफोन ग्राहकांची माफी मागितली आहे. रात्री एक वाजेच्या सुमारास एक विचित्र नोटिफिकेशन ग्राहकांच्या फोनवर पाठल्यामुळे कंपनीने माफी मागितली. या नोटिफिकेशनमध्ये दोन वेळेस केवळ ‘1’ लिहिला होता. हे नोटिफिकेशन सॅमसंगच्या Find My Mobile सर्व्हिसद्वारे पाठवण्यात आले होते. जवळपास 20 टक्के युजर्सना नोटिफिकेशन मिळाले. नोटिफिकेशनचा परिणाम फोनच्या बॅटरीवर झाल्यामुळे ग्राहकांनी अधिक नाराजी दर्शवली होती.

Galaxy S7, Galaxy A50 पासून Galaxy Note 10 यांसारख्या डिव्हाइसवर नोटिफिकेशन पाठवले गेले होते. त्यानंतर अनेक युजर्सनी नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. नाराज युजर्सनी ट्विटर आणि रेडिटवर आपला राग व्यक्त केला आणि कंपनीकडे याबाबत विचारणा केली. अखेर कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.

सॅमसंगने ट्विटरद्वारे विचित्र नोटिफिकेशनसाठी माफी मागितली आणि चुकून ते पाठवण्यात आलं होतं असं म्हटलंय. “अंतर्गत चाचणीदरम्यान ते नोटिफिकेशन चुकून पाठवलं गेलं होतं. त्याचा तुमच्या मोबाइलवर किंवा अन्य डिव्हाइसवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना झालेल्या त्रासाबाबत आम्ही दिलगीर आहोत, भविष्यात असे घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ” अशा आशयाचं ट्विट सॅमसंगने केलंय.

(आणखी वाचा – तेव्हा गाढव बांधून काढली होती धिंड, आता SUV ने 8 महिन्यांमध्येच केला धमाका)