सॅमसंग या दक्षिण कोरियन कंपनीने जागतील स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये भारतामधील विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सॅमसंगचा जागतिक बाजारपेठेमध्ये पहिला क्रमांक मिळवता आला आहे असं काउण्टरपॉइण्ड रिसर्च रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आल्याचं वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. शुक्रवारी हा अहवाल प्रकाशित झाला असून जागतिक स्तराबरोबरच जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनीच्या स्मार्टफोनचा भारतात सर्वाधिक खप झाल्याचे समोर आलं आहे. म्हणजेच मागील अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच सॅमसंगने भारतामध्ये चिनी स्मार्टफोन कंपन्यांना मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे. भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण झाल्यानंतर चिनी वस्तूंवर बंदी घालण्यासंदर्भात अनेकदा सोशल मिडियावर मोहीम राबवण्यात आली होती. याचाचा हा परिणाम असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२०१८ नंतर सॅमसंग पहिल्यांदात भारतातील पहिल्या क्रमांकाची स्मार्टफोन विक्रेता कंपनी ठरली आहे. ऑनलाइन माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी कंपनीने पूर्ण जोर लावल्याचे मागील काही महिन्यांमध्ये दिसून आलं. अनेक ऑफर्स, चीनविरोधी मत प्रवाह या सर्वांचाही कंपनीला फायदा झाल्याचे या अहवालात म्हटलं आहे. “राजकीय धोरणं आणि दोन देशांमधील राजकीय संबंधांचा स्मार्टफोन बाजारपेठेवर अनेक प्रकारे परिणाम होतो. या प्रदेशामध्ये अशा संधींचा फायदा घेणारे आणि त्याचा फटका बसणाऱ्या अनेक कंपन्या आहेत,” असं रिसर्च अ‍ॅनलिस्ट असणाऱ्या मिन्सू कँग यांनी म्हटलं आहे.  “यामुळेच अव्वल स्थानी असणाऱ्या कंपन्यांनी एकाधिकारशाही तयार केल्याचे चित्र दिसते. सॅमसंग, अ‍ॅपल, शिओमी, ओप्पो सारख्या मोठ्या कंपन्यांवर याचा थेट परिणाम होतो,” असंही कँग म्हणाले. मागील बऱ्याच महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या मूळ चिनी कंपनी असणाऱ्या शिओमी दुसऱ्या स्थानावर गेली आहे. मात्र भारतात कंपनीला फटका बसला असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खास करुन जेथे हुआवे कंपनीला फटका बसाला आहे त्या ठिकाणी म्हणजेच मध्य पूर्व युरोपमध्ये चांगलाच जम बसवला आहे.

जागतिक बाजारपेठेमध्ये सॅमसंगचा वाटा २२ टक्के इथका आहे. एप्रिल महिन्यामध्ये हुआवे कंपनीने पहिले स्थान पटकावल्यानंतर सॅमसंग दुसऱ्या स्थानी घसरली होती. मात्र ऑगस्टमध्ये हुआवेचा बाजारपेठेतील वाटा हा १६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. अमेरिकेने या कंपनीवर अनेक निर्बंध लादल्याने कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील वाटा आणखीन घसरण्याची शक्यता आहे.

 

करोनाच्या लॉकडाउननंतरही अ‍ॅपलने आपले स्थान कायम ठेवलं आहे. ऑक्टोबर महिन्यात आयफोन १२ लॉन्च केल्यानंतर कंपनीला स्मार्टफोनचा खप अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र ही वाढ नोव्हेंबर महिन्यात दिसेल असंही सांगितलं जातं आहे. आयफोन ११ च्या विक्रीमुळे अ‍ॅपलचा तोटा भरुन निघेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.