तुम्हाला फोटो काढण्याची आवड आहे का? तुम्हाला सेल्फी काढायला फारफार आवडतं का? तुम्हाला मोठे फोन वापरायला आवडतात का? तुम्ही नवीन मोबइल घेण्याचा विचार करत आहेत का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी; कारण सॅमसंगने त्यांच्या आगामी सी मालिकेतील पहिला फोन सी नाइन प्रो भारतामध्ये उपलब्ध केला आहे. सॅमसंग सी नाइन प्रो या फोनमध्ये सहा इंचांचा सुपर एमोलेड मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडीओ बघणे, गेम खेळणे, फोटो काढणे यांसारख्या गोष्टी अगदी सुस्पष्ट दिसतील ज्याचा तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकाल.

मोबाइल स्क्रीनवर २.५ डी कॉर्निग गोरिला ग्लास लावली आहे ज्यामुळे मोबाइल स्क्रीनवर ओरखडे पडणार नाहीत. तसेच हा मोबाइल पूर्णपणे धातूचा बनलेला आहे. यात प्लास्टिकचा वापर केलेला नाही. या मोबाइलमध्ये कॉलकॉम चा ६५३ ऑक्टा कोर प्रोसेसर वापरला आहे ज्यामुळे रोजच्या वापरात व्हिडीओ बघणे, खेळ खेळणे, फोटो काढणे, एकाहून अधिक अ‍ॅप एकसाथ वापरणे हे तुम्ही विनाअडथळा सहज करू शकता. सॅमसंग सी नाइन प्रो या मोबाइल मधे सहा जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी उपलब्ध आहे तसेच मेमरी स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. मेमरी कार्ड वापरण्यासाठी स्वतंत्र जागा दिली आहे ज्याचा उपयोग तुम्ही मेमरी स्टोरेज वाढवण्यासाठी करू शकता. तुम्हाला मोबाइलच्या बॅटरीबाबत चिंता करण्याची गरज नाही, कारण या मोबाइलमध्ये चार हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जिचा उपयोग तुम्ही एकदा चार्ज केल्यावर एक-दोन दिवस आरामात वापरू शकता. सॅमसंग सी नाइन प्रो जलद चार्जिगला साहाय्य करतो. फोटो काढण्यासाठी, विशेषत: सेल्फी काढणाऱ्यांसाठी, या मोबाइलमधील कॅमेरा अतिशय उपयुक्त आहे. या मोबाइलमध्ये मागील आणि पुढील दोन्ही कॅमेरा १६ मेगापिक्सेल आहेत तसेच मागील बाजूस दोन फ्लॅश देण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमचे फोटो अधिक चांगले होण्यासाठी फायदा होईल. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा मोबाइल दोन सिम कार्डला साहाय्य करतो, तसेच टू जी, थ्रीजी, फोरजी आणि व्हीओएलटीईला साहाय्य करतात. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम, एनएफसी (वायरलेस संपर्क तंत्रज्ञान), यूएसबी टाइप सी (मोबाइल चार्ज करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेली वायर) आहे.

तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह या मोबाइलला जोडू शकता ज्यामुळे पेन ड्राइव्हमधील गाणी, चित्रपट, फोटो किंवा फाइल मोबाइलमध्ये बघू शकता. या फोनच्या पुढील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे ज्याचा उपयोग स्क्रीन अनलॉक करण्यासाठी होतो. मोबाइल वापरताना आपण त्या मोबाइलमधील आपल्या माहितीच्या सुरक्षिततेबद्दल, मोबाइलच्या बॅटरीबद्दल आणि इंटरनेट वापरताना किती डेटा वापरला जाईल याबद्दल काळजी करत असतो. सॅमसंगने या सगळ्या गोष्टींचा विचार करून सॅमसंग सी नाइन प्रोमध्ये काही वैशिष्टय़े टाकली आहेत. यामध्ये एस सिक्युर आहे ज्याचा उपयोग करून आपण आपल्या मोबाइलमधील माहिती सुरक्षित ठेवू शकतो, एस पॉवरचा उपयोग करून मोबाइलची बॅटरी अधिक काळ टिकवू शकता, अल्ट्रा डेटा सेविंगचा उपयोग करून इंटरनेट वापरताना कमीत कमी डेटा वापरू शकता. सॅमसंग सी नाइन प्रो मोबाइल काळा आणि सोनेरी या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
फायदे
गोरिला ग्लास लावल्यामुळे मोबाइल स्क्रीनवर ओरखडे पडणार नाहीत
चार हजार एमएएचची बॅटरी देण्यात आल्यामुळे फोन एकदा चार्ज केल्यावर एक-दोन दिवस आरामात वापरू शकता
एस सिक्युर, एस पॉवर, अल्ट्रा डेटा सेविंग यांच्यामुळे फोन अधिक कार्यक्षम होतो.
तोटे
मोबाइलची किंमत अधिक
सहा इंची डिस्प्लेमुळे एका हाताने मोबाइल वापरणे सहज शक्य नाही
बॅटरी मोबाइलमध्ये बंद असल्यामुळे ती वापरकर्ता स्वत: काढू किंवा बदलू शकत नाही. त्यासाठी त्याला सॅमसंगच्या सेवा केंद्रामध्ये जावे लागेल.मोबाइल किंमत :
रु. ३६,९००/-

( सौजन्य : लोकप्रभा )

response.lokprabha@expressindia.com