देशभरात लॉकडाउन असताना Samsung ने भारतात आपला लेटेस्ट एंट्री लेवल स्मार्टफोन Galaxy J2 Core (2020) लॉन्च केला आहे. हा फोन सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे. लॉकडाउन संपल्यानंतर लगेचच या फोनची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे.

हा फोन म्हणजे 2018 मध्ये आलेल्या गॅलेक्सी J2 Core ची अद्ययावत आवृत्ती आहे. जुन्या फोनच्या तुलनेत नव्या फोनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या फोनमध्ये 5 इंचाचा qHD डिस्प्ले आहे. Exynos 7570 क्वॉडकोर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट आहे. याद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येईल. याशिवाय Apps इंस्टॉल करण्यासाठी किंवा मेमरी कार्डमध्ये फाइल्स किंवा अन्य कंटेंट हलवण्यासाठी ‘स्मार्ट मॅनेजर’चाही पर्याय या फोनमध्ये आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूला 8 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. तर, पुढील बाजूला 5 मेगपिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. याशिवाय कॅमेऱ्यात ऑटो फोकस, FHD व्हिडिओ रेकॉर्डिंग हे फीचर्सही आहेत.

किंमत आणि अन्य फीचर्स –
Galaxy J2 Core (2020) या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 2,600mAh रिमुव्हेबल बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बॅटरी 22 तासांपर्यंत टॉकटाइम बॅकअप देते असा दावा कंपनीने केला आहे. ड्युअल सिम कार्डल सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G एलटीई, वाय-फाय, मायक्रो युएसबी, 3.5mm हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 4.2 हे फीचर्स आहेत. कंपनीने 6,299 रुपये इतकी या नवीन बजेट स्मार्टफोनची किंमत ठेवली आहे.