सॅमसंग कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip लाँच केला होता. भारतात आता या स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंगला सुरूवात होत असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना गॅलेक्सी झेड फ्लिपची डिलिवरी 26 फेब्रुवारीपासून दिली जाणार आहे.

आणखी वाचा – (Samsung युजर्सना मिळाले विचित्र नोटिफिकेशन, कंपनीने मागितली माफी)

या फोनसाठी आजपासून कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि कंपनीच्या रिटेल स्टोअरवरून बुकिंग करता येणार आहे. 1 लाख 9 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. हा फोल्डेबल फोन व्हिडिओ किंवा फोटो काढताना 90 अंशापर्यंत वळतो, तसेच हा फोल्डेबल फोन तब्बल दोन लाख वेळेस सहजपणे उघडता आणि बंद करता येईल असा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये खास बिल्ट-इन फ्लेक्स मोड UI हे फीचर असून कंपनीने हे फीचर गुगलसोबत तयार केलंय. फोनमध्ये ‘Hideaway Hinge’ द्वारे हे फीचर सुरू करता येईल. गॅलेक्सी झेड फ्लिपमध्ये 3300 एमएएच क्षमतेची बॅटरी असून फास्ट चार्जिंगचा सपोर्ट याला देण्यात आलाय. या फोनमध्ये वायरलेस पावर शेअरसुद्धा आहे. याच्या मदतीने अन्य दुसरा फोन चार्ज करता येऊ शकणार आहे. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक फीचरही आहे.

या फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डायनेमिक अॅमोलेड डिस्प्ले आहे. तर फोल्ड केल्यानंतर 1.1 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर रियर पॅनलवर दोन कॅमेरे दिले आहे. दोन्ही कॅमेरे 12 मेगापिक्सलचे देण्यात आले आहेत. यात एक लेन्स वाइड अँगल आणि दुसरा अल्ट्रा वाइड आहे. कॅमेऱ्यासोबत ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन दिला आहे. याशिवाय दुसऱ्या डिस्प्लेवरून म्यूझीक सुरू-बंद करता येऊ शकते. या फोनचे वजन 183 ग्रॅम आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रैगन 855+ प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 8 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे.

(आणखी वाचा – तेव्हा गाढव बांधून काढली होती धिंड, आता SUV ने 8 महिन्यांमध्येच केला धमाका)