Samsung Galaxy Fold : अमेरिकेतील सॅन फ्रँसिस्कोमध्ये आयोजित UNPACKED 2019 इव्हेंटमध्ये सॅमसंग कंपनीने आपले नवीन फोन लॉन्च केले आहेत. यामध्ये बहुप्रतिक्षित फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. मूळ दक्षिण कोरियाची असलेल्या सॅमसंग कंपनीने मागील काही काळात मोबाईलच्या बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. दिवसागणिक बाजारात नवनवीन तंत्रज्ञानाचे मोबाईल दाखल होत असताना सॅमसंगनेही आपली ‘एस’ सिरीज बाजारात दाखल केली आहे.

5G कनेक्टिविटी असलेल्या सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत १९८० डॉलर इतकी आहे. या फोनची भारतीय बाजारपेठेत किंमत तब्बल एक लाख ४० हजार रूपये असणार आहे. भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची विक्री एप्रिलपासून सूरू होणार आहे. लग्जरी डिव्हायस असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

असा आहे पहिला फोल्डेबल स्मार्टफोन –
या स्मार्टफोनला असणाऱ्या २ बॅटरी २२०० मिली अॅम्पियर्सच्या आहेत. या फोनमध्ये दोन डिस्प्ले असतील. स्मार्टफोनची एक स्क्रीन आतल्या बाजूला तर दुसरी बाहेरच्या बाजूला असेल. डिस्प्ले प्राथमिक 7.3 इंच आहे आणि दुय्यम 4.58 इंचाचा आहे. टॅबलेट आणि स्मार्टफोन अशी दोन्ही कामे हा फोन करणार आहे. या फोल्डएबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7nm प्रोसेसर, १२ जीबी रॅम आहे. चार रंगामध्ये फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत दुप्पट वेगाने चालणार असल्याचा दावाही सॅमसंगने केला आहे. Galaxy Foldमध्ये एकूण ६ कॅमरे असणार आहेत.