स्मार्टफोन आणि इंटरनेट आल्यापासून आपला गाणी ऐकण्याचा अंदाज बराच बदलला आहे. आता आपण रेडिओ आणि म्यूजिक प्लेयरऐवजी आपल्या स्मार्टफोनवरच गाणी ऐकत असतो. गेलेले दिवस पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आणि जुन्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न सारेगामा कंपनीने केला आहे. कंपनीने कारवां मिनी 2.0 हा नवा ब्ल्यू-टुथ कनेक्टिव्हिटी असणारा स्पीकर लॉन्च केला आहे. हा रेडियो कम म्यूजिक प्लेयर स्पीकर आहे.

सारेगामा कंपनीच्या कारवां मालिकेतील स्पीकर्सना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, त्यानंतर कंपनीने कारवां मिनी 2.0 हे मॉडेल लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. नावाप्रमाणेच हे मॉडेल म्हणजे मूळ मॉडेलची मिनी आवृत्ती आहे. लता मंगेशकर, रफी आणि किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गजांची सदाबहार 351 गाणी यामध्ये आधीपासूनच देण्यात आली आहेत. यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला असून एकदा चार्ज केल्यानंतर तीन तासांचा बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. सफायर ग्रीन, सनसेट रेड, रीगल ब्ल्यू, मूनलाइट ब्लॅक, स्कायलाइन ब्ल्यू आणि मिंट ग्रीन या रंगांमध्ये कारवां मिनी 2.0 उपलब्ध आहे. मिनी आवृत्ती असल्याने मूळ मॉडेलपेक्षा यामध्ये काही फिचर कमी करण्यात आले आहेत. ब्ल्यू-टुथ कनेक्टिव्हिटी असणारा हा वायरलेस स्पीकर असून याला स्मार्टफोन अथवा पेन ड्राइव्ह कनेक्ट करण्यासाठी युएसबी पोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय वायरच्या सहाय्याने एक्स्टर्नल स्पीकर म्हणूनही याचा वापर करता येणं शक्य आहे.

2 हजार 499 रुपये इतकी याची किंमत असून फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावरुन खरेदी करता येईल. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये रेडिओ ऐकण्याचाही पर्याय देण्यात आला असून एएम आणि एफएम या दोन्ही प्रकारातील रेडिओचे ट्युनर देण्यात आले आहे.