वाचक लेखक
सतत संघर्षांच्या छायेत असलेल्या इस्त्रायलमध्ये असलेली ‘सेव्ह अ चाइल्ड्स हार्ट’ ही संस्था अगदी शत्रूराष्ट्रातील हृदयरोगाने ग्रस्त बालकांवरही विनामूल्य शस्त्रक्रिया करते.

एक ते तीन वर्षांच्या काही शिशुंना जन्मजात हृदरोग होतो. त्यांच्यावर उपचार करण्याकरिता डॉ. अमराम कोहेन यांनी १९९५ मध्ये इस्त्रायलमधे ‘वुल्फसन मेडिकल सेंटर’ची स्थापना केली. त्या संस्थेचे नाव ‘साक’ (SACH)  म्हणजे ‘सेव्ह अ चाइल्ड्स हार्ट’.

या शिशूंवरच्या प्रेमापोटी त्यांनी आजपर्यंत शस्त्रक्रिया करून हजारो बालकांचे प्राण वाचवले आहेत. काही बालकांना जन्मजात हृदरोग असतो. त्यातली पुष्कळशी बालके केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा शस्त्रक्रिया न केल्याने एक वर्षांच्या आत मृत्युमुखी पडतात, असे आढळून आले आहे. विकसनशील देशांत दर हजारामागे आठ बालकांना जन्मजात हृदरोग असल्याचे आढळून आहे. ‘एसएसीएच’चं आणखी वैशिष्टय़ं म्हणजे या संस्थेत केवळ इस्त्रायलमधील बालकांवर शस्त्रक्रिया करतात असा समज असेल तर ते चुकीचे आहे. ‘साक’मधील अध्र्याहून अधिक बालके वेस्ट बँक गाझा, इराक तसंच त्याशिवायही जवळजवळ तीसपेक्षा जास्त राष्ट्रांतील असतात. ती उपचाराकरिता येथे येतात. या बालकांबरोबर फक्त एक नर्स किंवा त्या एखाद्या नातेवाईकाला प्रवेश मिळतो. येथे बालकांवर शस्त्रक्रिया करून साधारणपणे ३० दिवसांत त्यांना परत पाठवण्यात येते. ‘साक’मधील जवळजवळ ७० टक्के कर्मचारी पगार न घेता काम करतात. ‘साक’मधील सेवा २४ तास केव्हाही उपलब्ध असते. एवढेच नव्हे तर ‘साक’मध्ये जगातील कुठल्याही डॉक्टर्सना या शस्त्रक्रिया करण्याचे शिक्षण दिले जाते. आतापर्यंत जवळजवळ हजारो डॉक्टर्स व नर्सेसना येथे असे शिक्षण दिले गेले आहे. त्याचप्रमाणे इथिओपिया, चीन, मॉरिशस, मालदीव, युक्रेन या देशांत देखील अशा शिक्षणाची सोय केलेली आहे. तेथील अनेक बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

‘साक’ सेंटरमध्ये अशा शस्त्रक्रिया अविरत चालूच असतात. त्यामुळे येथे अनेकांची नावे वेटिंग लिस्टवर असतात. ‘साक’मध्ये बालकांवरील शस्त्रक्रिया नेहमीपेक्षा अध्र्या दराने केल्या जातात. पण त्याकरिता बालकांच्या कुटुंबाकडून पैसे घेतले जात नाहीत. ‘साक’ या कामासाठी इस्रायलमधील धर्मादायी संस्था, युरोपियन युनियन तसेच अमेरिकेतील धर्मादायी संस्थांकडे मदत मागते आणि तशी त्यांना ताबडतोब मिळतेसुद्धा.

जगातील बहुतेक सर्व राष्ट्रांतील असंख्य बालके येथील हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि तीन-चार आठवडय़ांत संपूर्ण बरी होऊन परत जातात.

अशाच एका रुग्ण बालिकेची कथा. वफा हुसेनी या स्त्रीने एका मुलीला जन्म दिला. नूर तिचं नाव. ती सुरुवातीला चांगली हालचाल करीत असे. नंतर असे आढळून आले की ती अस्वस्थ होत असे व अधूनमधून ताप आल्यामुळे कोमेजलेली दिसत असे. म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे अल्ट्रा साऊंड स्कॅन केल्यावर आढळले की नूरचे हृदय बरोबर काम करीत नाही. हृदयाच्या खालच्या दोन भागांत छिद्र (चेंबर) असून त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा बरोबर होत नव्हता व त्यावर शस्त्रक्रिया हाच इलाज होता. नूरचे वडील रिक्षा रिपेअर करण्याचे काम करून घर चालवत होते आणि मुख्य म्हणजे नूरचे घर ‘गाझा’ या पॅलेस्टिनमध्ये होते. एका बाजूला समुद्र व दुसऱ्या बाजूस इस्रायल अशी गाझाची भौगोलिक स्थिती. दहा लाखांच्या पॅलेस्टाइनमध्ये ‘हम्मस’ ही संघटना सतत संघर्ष करून सत्तेवर आली होती आणि इस्रायलवर मिसाइल्सचा मारा चालू झाला होता. इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून पॅलेस्टाइनचे अन्न, पाणी, इंधन आणि औषधे यांचा पुरवठा बंद केला होता.

त्या अगोदर नूरच्या डॉक्टर्सनी वफाला सल्ला दिला की आणखी एक वर्ष थांबण्यास हरकत नाही कारण एक वर्षांनंतर हे छिद्र आपोआप बंद होण्याची शक्यता असते. पण नूर एक वर्षांची झाल्यानंतर नवीन प्रश्न उपस्थित झाला. नूरचा डावा डोळा मोठा होत होता व चमकत होता. हे तिला झालेल्या कॅन्सरमुळे झाले होते. मग नूरला केमोथेरपी देण्यात आली व डावा डोळा काढण्यात आला. केमोथेरपीमुळे नूरच्या रक्तपुरवठय़ावर परिणाम झाला. ताबडतोब शस्त्रक्रिया केली नाही तर नूरच्या जिवाला धोका होता. ओपन हार्ट सर्जरी करणे आवश्यक होते. ‘हम्मस’चे हल्लेव इस्रायलची प्रतिक्रिया यामुळे नूरला तेल अविवला ‘साक’मध्ये उपचाराकरिता जाणे अशक्य झाले. नूरची आई निराश झाली, परंतु स्वस्थ बसली नाही. तिने डॉक्टरांकडे जाऊन नूरला ‘साक’मध्ये प्रवेश मिळवण्यासंबंधी पुन्हा विनंती केली. या वेळेला मात्र नशिबाने साथ दिली व नूरला प्रवेश देऊ असे तिला सांगण्यात आले. पण पुन्हा दुर्दैव आड आले. ‘हम्मस’ने पुन्हा इस्रायलवर रॉकेट्सचा मारा चालू केला. इस्रायलने कडवा प्रतिकार करून तोफांची सरबत्ती, रॉकेट्स मारा, बॉम्बहल्ले करून गाझामध्ये जनजीवन विस्कळीत केले. इलेक्ट्रिसिटी, गॅसपुरवठा बंद झाला. नूरच्या आईला रस्त्यातील लाकडे गोळा करून त्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आली. तेही दिवस गेले. २५ जानेवारीला इस्रायलला जायचा परवाना मिळाला. तो घेऊन वफाने नूरसकट इस्रायलच्या हद्दीत प्रवेश मिळवला. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशनची तयारी केली.

इथे नेहमी हृदयरोगतज्ज्ञ आणि नर्सेस एकत्र येऊन त्या आठवडय़ातील सर्व पेशंट्सच्या ऑपरेशनबद्दल चर्चा करून ऑपरेशनची दिशा ठरवतात. नूरच्या हृदयाबद्दल चर्चा झाली तेव्हा डॉक्टर्सना आढळले की नूरच्या हृदयाला होणारा रक्ताचा पुरवठा फार तुरळक आहे. डॉ. लॉअर ससूननी सांगितले हे ऑपरेशन ताबडतोब केले पाहिजे. खरे तर हॉस्पिटलमध्ये त्या सुमारास इजिप्त, गाझा एव्हढेच नव्हे तर झांबीबार, केनियामधील बालकेदेखील ऑपरेशनकरिता आली होती.

नूरच्या आईने नूरकरिता नृत्यासाठीचे बूट घेतले होते. ऑपरेशनच्या अगोदर वफाने नूरला ते बूट घालायला दिले. नूरला खूप आनंद झाला. झोपतानादेखील नूर ते बूट घालूनच झोपली.

सकाळी नूरला ऑपरेशनला टेबलावर घेण्यात आले, त्यावेळी ते बूट एका लहानशा बॅगेमध्ये ठेवण्यात आले. तिच्या ऑपरेशनसाठी ११ जणांची टीम होती. मंद आवाजात एक गाण्याची टेप वाजत होती.

डॉ. ससून यांनी ऑपरेशन सुरू केले. हृदयाजवळील छिद्र सापडले. ते हृदयाच्या जवळजवळ १/५ एवढे मोठे होते. साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या सुयांच्या साहाय्याने नाजूक टाके घातले गेले व ते छिद्र बंद करण्यात आले. यंत्राच्या साहाय्याने एका छोटय़ा पडद्यावर त्या छिद्रातून रक्ताची गळती थांबली आहे, हे पाहून सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला.

नूरला नंतर काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. नूर आता थोडी बसावयास लागली आहे. आता तिला ते बूट घातले जातात. नूरच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद दिसत आहे. नंतर कॅन्सरमुळे गेलेल्या डोळ्याच्या जागी कृत्रिम डोळा बसवण्यात आला. तीन आठवडय़ानंतर नूर व वफा आपल्या घरी गाझामध्ये गेल्या.

या ऑपरेशनला साधारणपणे २५ हजार डॉलर्स खर्च येतो. पण ‘साक’मध्ये तेच ऑपरेशन दहा हजार डॉलर्समध्ये करण्यात येते. अर्थात हा खर्च त्या बालकांचे आई वडील करू शकत नाहीत. पण हा खर्च जगातील विशेषत: अमेरिका, युरोपीय देश व तेथील धर्मादाय संस्था करीत असतात.

एवढासा चिमुकला आपल्या गोव्याएवढय़ा आकाराचा, चारीबाजूंनी अरब राष्ट्रांनी वेढलेला हा देश. त्याच्या शत्रूंना तो तेथे नको आहे. तो जितक्या लवकर नष्ट होईल तेवढे या शत्रू राष्ट्रांना हवे आहे. या सगळ्या अरब राष्ट्रांच्या तुलनेत हा देश अत्यंत गरीब आहे. पण ‘हृदयाने’ श्रीमंत आहे. आपल्या अस्तित्वाकरिता या लोकांना २४ तास सावध असावे लागते. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी या राष्ट्राची परिस्थिती आहे. तरीपण त्यांनी जवळजवळ २५ वर्षांपूर्वी लहान मुलांच्या आयुष्याला बळकटी देण्याकरिता केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून या चिमुकल्या राष्ट्रात ही संघटना निर्माण केली. त्यातून आपल्या शत्रूंच्या राष्ट्रातील बालकांना नवीन जीवन देण्याकरिता कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता हे जे कार्य चालवले आहे.
वसंत गद्रे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा