हे आता कैकदा ऐकून कंटाळला असाल की, ‘फास्ट फूड’, ‘जंक फूड’ शरीरशत्रू असून त्याच्या अतिसेवनाने स्थूलत्वासोबत कैक समस्या निर्माण होतात. हे ऐकून घरात ‘प्रथिन’युक्त आहाराचा पूर आणण्याचा विचार कितीकदा करून सोडून दिला असाल. आपल्या अमेरिकीकरणाची प्रक्रिया निव्वळ वैचारिक पातळीवरच नाही झाली तर क्षुधाशांतीबाबतच्या शारीरिक पातळीवरही झाली आहे. पिझ्झा, बर्गर, इंडोचायनीज नूडल्स, पास्ता, चिप्स आणि चिकन नगेट्स यापैकी काही ना काही जणू देशी खाद्यान्न असल्यासारखा रोजच्या आहाराचा भाग बनत आहे. आज लहान मुले व्यसनांध झालेली कुठलीही कार्टून चॅनल्स तपासली, तर या फास्ट फुडी आहारांची, रसायनयुक्त सूप्सची, स्थूलत्वमित्र कुकीजची, दातशत्रू चॉकलेट्सची आणि आभासी फलरसांच्या आस्वादाची ‘जाहिराती’ दीक्षाच त्यांना दिली जात असल्याचे कळेल. ग्लोबल वॉर्मिगइतकेच भयंकर संकट या तयार होणाऱ्या पिढीच्या आहारसवयींनी पुढे उभे ठाकले आहे. फास्ट फूड परिणामांचा बागुलबुवा ज्ञात असूनही पुढील शीर्षक उच्चारताना ‘रसना’ जडावत असेल, तर नुसत्या फुकाच्या सल्ल्याऐवजी तयार केलेले काही नवे निष्कर्ष स्वीकारण्यास तयार राहा..
आपल्या देशात १९७०-८० च्या दशकात ज्यांचा जन्म झाला त्यांना फास्ट फुडी नुडल्सनी घरोबा कसा केला हे लख्ख आठवत असेल. सुरुवातीला त्या दोन मिनिटांत खाण्यास सज्ज बनणाऱ्या नुडल्स बनविण्याच्या प्रत्येकाच्या आठवणी विलक्षण असू शकतील. बनवता येत नसल्याने प्रत्येकाची अंतिम नुडल्स डिश कुठल्याही प्रकारामध्ये तयार होत असे. नंतर नुडल्स कंपनीची भरभराट झाली तशा त्याच्या जाहिरातींचीही वृद्धी झाली. मग नुडल्स चवदार बनविण्यासाठी एकसमान किंवा एकापेक्षा एक सरस पद्धती तयार झाल्या. आता देशाच्या शहराशहरांत, गावागावांत, टपऱ्या-टपऱ्यांवर कानाकोपऱ्यात पोहोचलेली दोन मिनिटी नुडल्सची जादू या ऐंशीउत्तर पिढीचा जगण्याचा आणि शरीराचा भाग बनण्याइतकी लोकप्रिय झाली आहे. (त्या आधीची पिढी अजूनही या नुडल्सना गांडूळ म्हणून हिणविते) या दशकाच्या पिढीला मात्र नुडल्स ‘ओल्ड फॅशन’ वाटत असून पिझा, बर्गर आणि ‘रेडी टू इट’ उत्पादनांचा इतका काही लळा लागला आहे, की वाढते स्थूलत्व, रसायनयुक्त आहारांनी थेट दिसणाऱ्या परिणामांची तमा न बाळगता आपण जाणतेपणी ‘फास्ट फूड राष्ट्रपुत्र’ घडवीत आहोत. अमेरिकेला ‘फास्ट फूड नेशन’ संबोधले जाते, ते त्यांच्या नागरिकांमध्ये फास्ट फुडी आहाराने तयार झालेल्या धक्कादायक स्थुलत्त्वामुळे. आपल्या राष्ट्रात आर्थिक विषमता, गरिबी, दारिद्र्य यांच्यामुळे स्थूलत्त्वाबाबत एकता होणे शक्य नसले, तरी शहरगावांत कुत्र्याच्या छत्रीसारख्या उभ्या राहणाऱ्या फास्टफुड यंत्रणांमुळे आणि रेडी टू इट उत्पादनांच्या सक्षम वितरणव्यवस्थेमुळे फास्टफूड आपल्याला जिरविण्यास तयार झाले आहे. कितीही प्रयत्न केला तरी हा फास्टफूड विळखा आपल्यापासून सुटणे शक्य नाही. मात्र त्याच्या किमान सेवनाने अपायाची मात्रा आपण कमी नक्कीच करू शकतो.
निष्कर्षांचे चक्रव्यूह!
फास्ट फूड खाल्ल्याने बुद्धी भ्रष्ट होते, इथपासून सुरू केले तर स्थूलत्वाशी संबंधित आजार होतात, रक्तदाब, चिडचिडेपण वाढतो, झोपेची नियमितता टळते, मुले-मुली लवकर वयात येतात, मन तंदुरुस्ती बिघडते, बद्धकोष्ठता वाढते, विस्मृती विस्तार होतो आणि कैक पारंपरिक, सरधोपट आजारांचा शरीरावर हल्ला होतो, अशा संशोधन अहवालांनी वृत्तपत्र, मासिकांची पाने सातत्याने व्यापलेली दिसतात. फास्ट फूडचा आस्वाद घेतानाच आपण त्या अहवालांना कित्येकदा वाचत असल्याने तो संशोधनी बाण काही वेळातच निकामी बनून आपण पुन्हा नव्याने फास्ट फूड आस्वादण्यास तयार होतो. नुकतेच एक ताजे आणि गरमागरम संशोधन आहे की, पिझ्झा खाल्ल्याने त्यातील घटक ‘नोरो व्हायरस’ या विषाणूचा फैलाव करण्यास प्रतिबंध करतो. मळमळणे, उलटय़ा होणे यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नोरो व्हायरसला मारण्यास उपयुक्त म्हणून पिझ्झा खावा असा सल्ला या अमेरिकी संशोधनातून देण्यात आला आहे. हे संशोधन कैक महिने, प्रयोगशाळेत शास्त्राधाराने राबविले जात असले, तरी त्यांच्या निष्कर्षांमधील तथ्ये खरी कशी मानायची असा प्रश्न पडतो. आपल्याकडच्या एका प्रतिष्ठित संस्थेच्या अभ्यासगटाने मोबाइल टॉवर हे शरीरास अपायकारक असून, त्याच्या घातक प्रारणांमुळे कर्करोगादी समस्या होतात, असा निष्कर्ष काढला होता. गंमत म्हणजे पुढल्या काहीच महिन्यात याच संस्थेच्या दुसऱ्या आणखी एका अभ्यासगटाने मोबाइल टॉवरमुळे शरीरास कोणताही अपाय होत नसल्याचा नवा कोरा निष्कर्ष काढला. संस्था एकच, अभ्यासगट आणि निष्कर्ष मात्र वेगवेगळे. (खरे-खोटे ते देवाऐवजी अपाय झालेल्या आणि न झालेल्या शरीरांनाच माहिती.) काही उत्पादनसंस्था जाणीवपूर्वक संशोधन संस्थांना गाठीला घेऊन विकतचे निष्कर्ष पसरवतात आणि त्यानंतर आपल्या उत्पादनांना बाजारात सुयोग्य वातावरण तयार करतात. या संस्थांची अर्थशक्ती बलाढय़ असल्याने त्यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या निष्कर्ष चक्रव्यूहातून आपली सुटका होत नाही. सवयीने किंवा निष्कर्षनिमित्ताने आपण आकर्षक, चवयुक्त उत्पादनांच्या जाळ्यात विसावतो. काही वर्षांपासून शेतीतील रसायन उपयोगात वाढ झाल्यामुळे अन्नधान्यही पूर्ण सुरक्षित नसल्याचे, फळ-भाज्याही रसायनांनी भरल्याचे निष्कर्ष येत आहेत. आपल्या ताटात रसायनयुक्त आहार नसल्याच्या बेफिकिरीमुळेच आपण जिवंत आहोत. अन्यथा निष्कर्षप्रेमी बनलो असतो, तर नक्की काय खावे या निष्कर्षांच्या शोधात वणवण फिरलो असतो.
थोडे ‘फास्ट’ ज्ञान!
वेळ वाचविण्यासाठी अन्नग्रहणासाठी फास्टफूड पळवाटेचा उपयोग झाला. न्यूयॉर्क शहरामध्ये जुलै १९१२ रोजी उघडण्यात आलेले ‘ऑटोमॅट’ हे आधुनिक फास्ट फूड साखळी उभारणारे पहिले क्षुधाशांतीगृह म्हणून ओळखले जाते. ‘लेस वर्क फॉर मदर’ या घोषवाक्यासह मंदीकाळापर्यंत या फास्ट फूड साखळीने अमेरिकी शहरांना व्यापले. पुढे मॅक्डॉनॉल्ड, केएफसी, वेण्डीज यानंतर आलेल्या साखळ्या केवळ अमेरिकीच राहिल्या नाहीत, तर त्यांनी विश्वसंचाराचा विडा उचलला.

कुटुंब संक्षिप्तीकरणामुळे, रोजगारातील स्त्री-पुरुष समानतेमुळे आणि यंत्र-तंत्र युगाने जगणे वेगवान बनल्याने फास्टफूड पर्यायाला स्वीकारणे भाग पडले. प्रमाणित चव, दिखाऊ स्वच्छता आणि पर्याप्त प्रमाणात उदरभरण होत असल्यामुळे या अमेरिकी फास्टफूड संस्कृतीचा प्रसार इतर प्रगतशील राष्ट्रांमध्येही सारख्याच प्रमाणात झाला. सर्वच खंडांमध्ये सहजसोप्या पाकिटबंद रेडी टू इट उत्पादनांचा सुळसुळाट झाला.

काही दशकांतच फास्ट फूड कंपन्या श्रीमंत झाल्या, मात्र फास्टफूड आस्वादक शारीरिकदृष्टय़ा ‘गब्बर’ बनले. स्थूलत्व ही मूलभूत तर रक्तदाबापासून हृदयविकारासारख्या विविध समस्यांनी फास्ट फूडप्रेमी कातावले. या दरम्यान पारंपरिक अन्नपदार्थाची चवविस्मृती झाल्यामुळे फास्ट फूड चक्रव्यूह भेदणे कठीण बनले आहे. यासाठी जगभरात ‘स्लो फूड’ नावाची चळवळ अस्तित्वात आली आहे.

इटलीच्या कालरे पेट्रिनी यांनी फास्ट फूडला विरोध करण्यासाठी १९८० साली ‘स्लो फूड’ चळवळ तयार केली. युरोपसह १०० देशांमध्ये या चळवळीचे सदस्य आहेत. जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांविरोधात उभ्या राहिलेल्या मोहिमांपैकी ही मानली जात आहे. फास्ट फूडच्या दुष्परिणामांचा आणि पौष्टिक पदार्थाच्या आवश्यकतेचा प्रचार आणि प्रसार ही चळवळ करते. मात्र तिचे स्वरूप अद्याप सूक्ष्म आहे.
नक्की काय करायला हवे?
अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, चीन यांच्यानंतर फास्ट फूडप्रेमी राष्ट्रांच्या पंक्तीत भारताचाही समावेश झालेला आहे. आपल्याकडे आपली फास्ट फूड यंत्रणा आधीपासूनच अस्तित्वात होती. आंतरराष्ट्रीय फास्ट फूड साखळ्यांमध्ये किमान दिखाऊ स्वच्छतेची हमी असते. मात्र उघडय़ावर मिळणाऱ्या आपल्या पारंपरिक फास्ट फूडमध्ये अनंत जिवाणू-विषाणूसंगती नांदत असते. आपले शरीर अब्जो जिवाणू-विषाणूंचे माहेरघर असले, तरी रोगप्रतिकारक जिवाणू दरवेळी परिणामकारक ठरत नाही आणि बाहेरचे ‘अन्न बाधण्या’च्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. भारतात शहराशहरांतील १० पैकी ८ घरांमध्ये फास्ट फूडशरण व्यक्ती राहतात. आकडेवारी धक्कादायक आणि भीषण आहे. मात्र त्यांचा सोस न ठेवता आपल्या आजूबाजूला आणि प्रत्यक्ष घरात डोकावल्यास आपण  किती फास्ट फूडसेवक झालो आहोत, याचा तपशील मिळेल. उदारीकरण पर्वामध्ये हाती खुळखुळणाऱ्या पैशांनी, टीव्ही-इंटरनेटच्या माध्यमातून आपले फास्टफुडीकरण झाले. ते आता सर्वच समाजात इतके भिनले आहे की, नव्या पिढीची त्यापासून सुटका करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मग या सगळ्यातून मध्यम मार्ग काढायचा झाला तर काही नव्या चांगल्या सवयी जोडाव्या लागतील. फास्ट फूडचे मर्यादेत सेवन करून पारंपरिक घरगुती अन्नाला शक्य तितके प्राधान्य द्यायला हवे. साठवण प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळून त्यांना चांगला पर्याय शोधायला हवा. इंटरनेट, अ‍ॅप्स यांचा उपयोग प्रथिनसमृद्ध आहाराच्या नियोजनासाठी करता येऊ शकेल. फळे, पालेभाज्या, फळभाज्या, सॅलेड्स, दूध यांचा जास्तीत जास्त वापर केल्यास फास्ट फुडी अपायावर प्रतिबंध बसेल. आपण काय आणि कोणते अन्नग्रहण करतो, त्यानुसार आपला चेहरा आणि शरीर दिसते. आपल्याला कसे दिसायचे आणि बनायचे आहे, हे प्रत्येकाने ठरविणेच इष्ट.