जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनवर मोबाइल फोन चार्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्मार्टफोनला सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करतेवेळी सावधानता न बाळगल्यास आपल्या स्मार्टफोनमधील महत्त्वाचा डेटा चोरीस जाऊ शकतो. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्या युएसबी पोर्टमध्ये मोबाइल चार्जिंग करणे धोकादायक असल्याचा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर फोन चार्जिंग करु नका नाही तर तुम्हाला मोठं नुकसान होईल असा इशारा बँकेने दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग पोर्टमधून ‘ज्यूस जॅकिंग’ या संकल्पनेद्वारे डेटा चोरीस जाण्याची भीती असते. त्यासाठी हॅकर्सनी सार्वजनिक वापराची ठिकाणं लक्ष्य केलेली आहेत. याबाबत नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरद्वारे खातेधारकांना सतर्क केले आहे. ज्यूस जॅकिंग, एक यूएसबी चार्जर घोटाळा आहे. हॅकर्स चार्जिंग स्टेशन्सवरुन तुमच्या ऑनलाईन बँकिंग किंवा पेमेंट सर्व्हिस अ‍ॅप संबंधित युजर आयडी आणि पासवर्ड चोरी करु शकतात. यामुळे तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा इशारा एसबीआयने ट्विटरद्वारे दिलाय. अनेकदा आपण चार्जर विसरतो आणि बस, रेल्वेस्टेशन, विमानतळ अशा आणि इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग पोर्टद्वारे फोन चार्ज करतो. पण नंतर अनेकांचे मोबाइल स्लो किंवा हँग होण्याचे किंवा सतत बॅटरी डाऊन होण्याचे प्रकार होतात. हे सर्व प्रकार ‘ज्यूस जॅकिंग’मुळे झालेल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपला मोबाइल आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःचे चार्जर नेहमी सोबत बाळगले पाहिजे.

ज्यूस जॅकिंग –
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग पोर्टमध्ये एक चीप म्हणजेच एक प्रोग्राम सेट केलेला असतो, ज्याद्वारे आपल्या मोबाइलमध्ये ‘मालवेअर’ इन्स्टॉल करून आपल्या मोबाइलची माहिती सहजरित्या चोरीस जाऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग युएसबी पोर्टद्वारे कनेक्ट केलेल्या मोबाइल अथवा डिव्हाइसमधून मालवेअरच्या सहाय्याने माहिती चोरणे म्हणजे ‘ज्यूस जॅकिंग’.