SBI recruitment 2020 : भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयमध्ये यावर्षी १४ हजार पेक्षा जास्त पदांची भरती करण्यात येणार आहे. सोमवारी एसबीआयने याची माहिती दिली. कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणखी कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, त्यामुळे या जागांची भरती करण्यात येणार असल्याचं कंपनीनं सांगितलं. ही भरती व्हीआरएसमुळे (स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजनेनंतर) नसल्याचेही एसबीआयने स्पष्ट केलं आहे.

करोना महामारीमुळे देशात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा परिस्थिती एसबीआय नोकरीची संधी देत आहे. कर्मचाऱ्यांची कपात करण्यासाठी व्हीआरएस योजना नसल्याचेही एसबीआयने सोमवारी सांगितलं. ३० हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना व्हीआरएसमुळे नोकरी सोडणार असल्याच्या वृत्ताचं एसबीआयनं खंडन केलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांची कपात करण्यासाठी व्हीआरएस योजना नसल्याचं एसबीआयच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे.

काय म्हणाली बँक –
सोमवारी एसबीआयनं सांगितलं की, कर्मचाऱ्यांबाबत बँक नेहमीच सकारात्मक आणि अनुकूल राहिली आहे. बँक आपला व्यावसाय वाढवत आहे त्यामुळेच यंदा १४ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सध्या एसबीआयमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱी कार्यरत आहेत.

VRS योजनेचे स्वरूप काय?
वयाची ५५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील एसबीआयच्या कर्मचाऱ्यांना योजनेत सहभाग घेता येणार आहे. हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा पाच हप्त्यांत विभागून मिळणार आहे. पेन्शन व रजेबाबतही लागू असलेले भत्ते स्वेच्छानिवृत्ती योजनेत मिळणार आहेत. ही योजना एक डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत आहे. यावेळात व्हीआरएस योजनेसाठी एसबीआयचे कर्मचारी अर्ज करु शकतात.