भारतीय वंशाच्या संशोधकाचे संशोधन

हृदयविकाराचा अंदाज देणारी रक्ताची चाचणी भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील संशोधक पथकाने शोधली आहे. या रक्तचाचणीचा वापर करून रक्तात ट्रोपोनिन हे प्रथिन किती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. आकस्मिक उपचार विभागात दोनतृतीयांश रुग्णांत अशा प्रकारच्या चाचणीचे निदान खरे ठरले आहे.

ब्रिटनच्या एडिंबर्ग विद्यापीठात संशोधक असलेल्या अनुप शहा यांच्या मते आतापर्यंत हृदयविकाराचे निदान करणारी कुठलीच जलद चाचणी नव्हती. आम्ही विकसित केलेल्या चाचणीत ट्रोपोनिनचे प्रमाण मोजले जाते. (ते ५ नॅनोग्रॅम/ डेसिलिटरपेक्षा कमी असणे आवश्यक असते.) त्यापेक्षा ते खाली गेले तर हृदयविकाराची शक्यता कमी असते. त्यामुळे विनाकारण रुग्णालयात दाखल करून घेण्याचे प्रकार टाळता येतील व त्यातून पैशांची बचतही होईल. आपल्याकडे छातीत दुखू लागताच रुग्णालयात दाखल केले जाते, त्यात ट्रोपोनिनचे प्रमाण जास्त असेल तरच हृदयविकाराचे निदान केले जाते. परत परत चाचण्या व रुग्णालयात राहावे लागणे टाळण्यासाठी या चाचणीचा उपयोग होईल.

नवीन ट्रोपोनिन चाचण्या कमी-जास्त धोका असलेले रुग्ण कोणते ते सांगू शकतात. आताच्या प्रमाणित चाचणीपेक्षा ही चाचणी संवेदनशील असून त्यात अगदी कमी प्रमाणातील ट्रोपोनिनही ओळखले जाते. ट्रोपोनिनची पातळशी छातीत दुखू लागलेल्या ६ हजार रुग्णांमध्ये ही चाचणी स्कॉटलंड व अमेरिकेतील चार रुग्णालयांत करण्यात आली. शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे या ट्रोपोनिनचे प्रमाण कमी असेल तर ३० दिवस तरी धोका नसतो. रक्तात ट्रोपोनिनचे प्रमाण लिटरला ५ नॅनोग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये.

साधारण यापेक्षा खालील पातळीत ६१ टक्के रुग्णांना हृदयविकाराचा धोका आढळला नाही त्यामुळे अनेक रुग्णांना घरी पाठवण्यात आले. वय, लिंग व हृदयाशी संलग्न घटक बघता यात हे प्रमाण उणे ९९.६ टक्के असेल तर फारच कमी धोका असतो. एक वर्षांत या रुग्णांना ट्रोपोनिन जास्त असलेल्या रुग्णांपेक्षा हृदयविकाराचा धोका तीन पटींनी कमी असतो. ‘द लॅन्सेट’ नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.