वैज्ञानिकांना एक अनोखे संप्रेरक तयार करण्यात यश मिळाले आहे. मानवाच्या शरीरातील ‘लव्ह हार्मोन’ म्हणून ओळखले जाणाऱ्या ऑक्सिटॉक्सिन या संप्रेरकापासून ते तयार करण्यात आले आहे. ऑक्सिटॉक्सिन हे संप्रेरक प्रसूतीकळांना नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगाचे असते. त्याचप्रमाणे समजुदारपणा वाढवण्यासाठी, समाजाप्रतीच्या भावना, ताण तणावर आणि चिंतेशी संबंधित भावनांवर नियंत्रण ठेवते.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड विद्यापिठाच्या मार्कस मुटेनथेलर यांनी यांसदर्भात माहिती दिली. ऑक्सिटॉक्सिनमुळे मज्जासंस्थेशी जोडणारे अनेक रिसेप्टर्स (संवेदनांचे वहन करणारे स्नायू) एकाच वेळी कार्यरत होतात. ज्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. उदाहणार्थ गर्भवती स्त्रीच्या शस्त्रक्रियेदम्यान प्रसूतीकळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर होतो. मात्र त्याचे प्रमाण जास्त झाले तर दीर्घकाळासाठी त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. अतिवापर झाल्यास ऑक्सिटॉक्सिनमुळे गर्भाशय फाटण्याची किंवा गर्भाशयाशी संबंधित हृदयाकडून येणारी रक्तवाहिनीमधील रक्तप्रवाहात अडथळा येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असे मुटेनथेलर यांनी सांगितले.

ऑक्सिटॉक्सिनच्या मुलभूत साच्यात (मॉलिक्युलर स्ट्रक्चर)छोटे-छोटे बदल करुन शास्त्रज्ञांनी एक नवीन अणू तयार केला आहे. या नवीन बदलांमुळे ऑक्सिटॉक्सिनचा रिसेप्टर्सवर होणारा परिणाम कमी होतो. ऑक्सिटॉक्सिनच्या मूळ जडघडणीमध्ये बदल करुन तयार करण्यात आलेले हे नवीन संप्रेरक ऑक्सिटॉक्सिन इतकेच प्रभावी आहे मात्र त्याचा रिसेप्टर्सवर वाईट परिणाम होत नाही. यामुळे हृद्याशी संबंधित स्नायूंवर परिणाम होत नाही तसेच गर्भाशय अचानक आकुंचनही पावण्याची समस्याही या नवीन संप्रेरकांच्या वापरामुळे उद्मभवत नाही.

ऑटिझम, मायग्रेन, स्क्रिझोफ्रेनिया, एनझायटी आणि ताणतणावासारख्या मानसिक आजारांवर इलाज करण्यासाठी ऑक्सिटॉक्सिनचा वापर होतो. मात्र त्याच्या साईड इफेक्टमुळे त्याचा वापर खूपच जपून केला जातो. हे नवीन ‘लव्ह हार्मोन’ कमी वेदनादायी आणि कमी साईड इफेक्ट असणारे आहे. त्यामुळेच या नवीन संप्रेरकाकडे समस्येवरील पर्याय म्हणून पाहता येईल. भविष्यामध्ये अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी या नवीन संप्रेरकांचा अधिक प्रभावीपणे वापर करता येईल अशी आशा मुटेनथेलर यांनी व्यक्त केली आहे.