अनेक लोकांना आता स्मार्टफोनमुळे उठसूट सेल्फी काढण्याची सवय जडली असून तो एक आजारच आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे, या आजाराला सेल्फिटीस संबोधले जाते. याबाबतचा अभ्यास भारतात करण्यात आला आहे.

नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठ व तामिळनाडूची त्यागराजर स्कूल मॅनेजमेंट या संस्थांनी २०१४ मध्ये सेल्फिटिसची चर्चा सुरू झाल्यानंतर याबाबत संशोधन सुरू केले. सेल्फिटिस हा मानसिक रोग असल्याचे वर्गीकरण पहिल्यांदा अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशनने केले होते.  आता सेल्फिटिस वर्तन हा रोग असल्याचे ठोसपणे सांगण्यात आले आहे.

या रोगाची पातळी ठरवण्यातही यश आले आहे. २०० ते ४०० व्यक्तींच्या सहभागातून त्याबाबत संशोधन करण्यात आले. भारतात फेसबुक वापरकर्ते सर्वाधिक व सेल्फीने झालेल्या मृत्यूंची संख्याही सर्वाधिक असल्याने भारताची निवड या संशोधनसाठी केली गेली.  इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेन्टल हेल्थ अँड अ‍ॅडिक्शन या नियतकालिकात या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

दिवसातून तीन वेळा सेल्फी काढूनही ते समाज माध्यमांवर न टाकणे ही सेल्फीटिसची व्याख्या करण्यात आली आहे. सेल्फीटिसचा आजार विकोपास गेला असेल तर त्याची व्याख्या रोज तीन सेल्फी काढून त्यातील प्रत्येक सेल्फी समाजमाध्यमांवर टाकणे अशी आहे. जुनाट सेल्फिटिस रोगाची व्याख्या रोज सतत सेल्फी काढण्याचा मोह होऊन दिवसातून सहा वेळा सेल्फी समाजमाध्यमांवर टाकणे अशी केली आहे.

सेल्फिटिस हा रोग असल्याची अफवा आहे असे म्हटले जात होते, पण तो खरोखरचा रोग आहे असे नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठाचे मार्क ग्रिफिथ यांनी सांगितले. आत्मविश्वासाच्या अभावातून लोक सेल्फी काढतात व आजूबाजूच्या लोकात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात असे टीएसएमचे सहायक प्राध्यापक जनार्दन बाळकृष्णन यांनी म्हटले आहे.