भारतीय संस्कृतीत तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकरसंक्रातीच्या सणाच्या दिवशी तर बहुतेक तिळाचे पदार्थ बनविले जातात. तिळाचे तेल तर मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक असते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

भारतामध्ये तब्बल सात कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत. २०१४ मध्ये ६.६८ कोटी, तर २०१५मध्ये ६.९१ कोटी लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. जर आहारात तिळाच्या तेलाचा अधिकाधिक वापर केल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. जगभरात दरवर्षी तब्बल ३० लाख टन तेलाचे उत्पादन केले जाते, त्यापैकी भारतात ३० टक्के उत्पादन होते. त्यामुळे तिळाच्या तेलाचा वापर मधुमेहग्रस्तांनी नियमित केला पाहिजे, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.

तिळाच्या तेलामध्ये ‘ई’ जीवनसत्त्व आणि लिगनॅन्स हे अ‍ॅण्टीऑक्सिडेंट विपुल प्रमाणात असते. ‘टाइप-टू’ मधुमेह झालेल्यांसाठी हे घटक उपयुक्त असतात. मधुमेहग्रस्त रुग्ण कार्डिओव्ॉस्कुलर (हृदयातील रक्तवाहिन्यांचा विकार) या विकाराने त्रस्त असतात. तिळाच्या तेलाचे नियमित सेवन केल्यास या विकाराचे निर्मूलन होण्यास मदत होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)