आरोग्यमंत्र्यांची संसदेत माहिती

जगातील प्रत्येक तेरावा कर्करोगग्रस्त हा भारतीय आहे. म्हणजेच जगातील साडेसात टक्के कर्करोगग्रस्त भारतातील आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत दिली. या माहितीद्वारे त्यांनी कर्करोगाचे धक्कादायक वास्तव मांडले.
२०१२मध्ये जगभरातील कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एक कोटी ४० लाख ६७ हजार ८९४ रुग्णांपैकी भारतात १० लाख ५७ हजार २०४ कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत. कर्करोगग्रस्तांच्या वाढणाऱ्या संख्येला देशाची वाढती लोकसंख्या, आधुनिक जीवनशैली, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचा वापर आणि निकृष्ट आहार ही कारणे जबाबदार आहेत, असेही नड्डा यांनी सांगितले. कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत.
केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसोबत कर्करोगाचा प्रतिबंध, त्यांचे निराकरण आणि उपचार पद्धती अशी त्रिसूत्री हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून सुदृढ जीवनशैली करण्याचे मुख्य उद्दिष्ट आखण्यात आले आहे, असे नड्डा म्हणाले.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाद्वारे जिल्हा स्तरावर आरोग्य जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार कर्करोग, मधुमेह, हृदय आणि पक्षाघात आदी आजारांविषयी माहिती आणि त्यांचे निराकरण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
कर्करोगाच्या वाढत्या प्रभावाला प्रतिबंध, त्याचे त्वरित निदान आणि आवश्यक उपचारपद्धती यांसाठी केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे नड्डा यांनी सांगितले.

‘डेंग्यू प्रतिबंधासाठी लसीकरण
मोहिमेची गरज नाही’
डेंग्यूच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम आखण्याचा कोणताही विचार केंद्र सरकारचा नाही. त्याऐवजी स्वच्छता आणि औषधांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. स्वाइन फ्लूसाठीही कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाची मोहीम हाती न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने लहान मुलांच्या जीविताला धोकादायक असणाऱ्या सात विकारांपासून निराकरण करण्याच्या उद्दिष्टाने ‘इंद्रधनुष्य मोहीम’ हाती घेतली आहे. यासाठी विशेष निधीही देण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत अनियमितता, गैरप्रकार आणि वापरायोग्य नसलेल्या औषधांविषयीच्या तक्रारींची दखल केंद्र सरकारकडून घेतली जात आहे.