18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

तुम्हालाही ‘पेन-किलर’ घ्यायची सवय आहे? हे नक्की वाचा

वेळीच लक्षात घ्या

डॉ. पद्माकर पंडित, प्राध्यापक, औषधशास्त्र | Updated: October 10, 2017 1:08 PM

प्रातिनिधिक छायाचित्र

वेदनांमुळे रुग्णाला आपल्या आजाराची जाणीव होते. थोडक्यात वेदना ही बऱ्याच आजारांची व्यक्त करण्याची भाषा आहे. रुग्णाच्या दुखण्यावरुन डॉक्टर त्याचे निदान आणि उपचार करतात. दुखण्याचे अचूक वर्णन (उदा. भाजलं / टोचलं / ठसठसलं / चमक इत्यादी) जर रुग्ण करू शकला तर ते निदान व उपचारसाठी खूपच उपयुक्त ठरते. वेदनाशामकांच्या योग्य वापराने वेदना नाहीशा व कमी करता येतात. प्रभावी वेदनाशामके हे आधुनिक औषधशास्त्राचे एक वरदान असून रोज कोट्यवधी रुग्ण वेदनाशामकांच्या सेवनाने स्वतःला सुस्थितीत ठेवू शकतात.

उपाय काय?

वेदना कमी करणाऱ्या औषधांना वेदनाशामके (पेन किलर्स) म्हणतात. मात्र सर्वच वेदनांवर हीच औषधे वापरली जातात असे नाही. उदा. शस्त्रक्रिया करताना रुग्णास वेदना जाणवू नयेत म्हणून भूल देतात, त्यासाठी भूल देण्याचे औषध वापरले जाते. हृदयविकाराचा झटका आला असता जिभेखाली ठेवण्याचे जे औषध वापरतात, ते हृदयावरील कामाचा ताण कमी करून उरो वेदना शमवतात. थोडक्यात काही विशिष्ट आजारांच्या वेदना कमी करण्यासाठी जी औषधे वापरतात त्यांना सर्वसाधारणपणे आपण वेदनाशामके म्हणतो.

वेदनाशामकांचे प्रकार –

मुख्यत्वे दोन आहेत. पहिल्या प्रकारात वेदना शमन करतानाच मज्जासंस्थेवरही (मेंदू) परिणाम करणारी अफूपासून निर्मिलेली मॉर्फीन गटातील औषधे येतात. ही औषधे सर्रास न वापरता अगदी आवश्यक तेव्हाच वापरावीत असा शास्त्रीय दंडक आहे.
दुसऱ्या प्रकारात वेदना शमन करतानाच मेंदूवर परिणाम न करणारी रासायनिकदृष्ट्या आम्ल असणारी ऍस्पिरिन सारखी औषधे येतात. त्यात विविध १० ते १२ उपगटातील तीसहून अधिक औषधांचा समावेश होतो. यापैकी अनेक औषधे अनेक व्याधीत वेदना शमनासाठी सर्रास वापरली जातात.

गुणकारी आल्याचे आठ फायदे

वेदनाशामकांचे (पेन किलर्सचे) दीर्घकालीन दुष्परिणाम –

प्रत्येक वैज्ञानिक शोधाचे फायदे-तोटे असतात, तसेच हे आहे. जगभर रोज कोट्यवधी लोक वेदनाशामके घेतात. त्यातील अनेकांना ती नियमित किंवा अधूनमधून घ्यावीच लागतात. मात्र ही औषधे घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

१. या औषधांनी पोटाला होणार त्रास लक्षात घ्यायला हवा. पॅरासिटामोल वगळता सर्वच औषधांनी जठरातील आम्लाचा तेथील अंत:त्वचेवर होणारी इजा अथवा व्रणसदृश परिणाम वाढतो. असा त्रास ज्यांना होतो त्यांनी ही औषधे उपाशीपोटी घेऊ नयेत, काहीतरी खाऊनच घ्यावीत. अनेकदा या औषधांमुळे पोटातील आम्ल-पित्ताचा त्रास वाढू नये म्हणून आम्लस्राव कमी करणारी प्राझोल व टिडीन गटातील औषधे दिली (व रुग्णांकडून परस्पर) घेतली जातात. अशा औषधांचा अतिवापरही घातक ठरू शकतो.

२. ऍस्पिरिनसारख्या वेदनाशामकांच्या दीर्घकालीन सेवनाने मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन ते मंदावू शकते. ही बाब जर वेळीच लक्षात आली नाही तर अखेर मूत्रपिंडे अकार्यक्षम होऊन आयुष्यभर डायलेसिस करावे लागू शकते किंवा मूत्रपिंडारोपणाची गरज भासते. तेव्हा ज्यांना वर्षानुवर्षे वेदनाशामके घ्यावी लागतात त्यांनी ठराविक काळानंतर नियमित मूत्रपिंड कार्यक्षमता चाचण्या कराव्यात.

३. या औषधांच्या दीर्घकालीन सेवनाने यकृताच्या ही कार्यावर विपरीत परिणाम होऊन ते मंदावू शकते. यावर वेळीच उपाय केल्यास ठिक नाहीतर यकृत निकामी होण्याचाही धोका असतो.

४. वेदनाशामकांच्या दीर्घकालीन सेवनाने शरीरात क्षार व पाणी साचून सूज येऊ शकते. त्यामुळे रक्तदाब वाढून हृदयाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

डॉ. पद्माकर पंडित, प्राध्यापक, औषधशास्त्र

First Published on October 10, 2017 1:03 pm

Web Title: side effects of pain killers useful tips for good health