वॉशिंग्टन : भारत, चीन यासारख्या अतिप्रदूषित देशात राहणाऱ्या लोकांना मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता अधिक असल्याचे एका संशोधनात दिसून आले आहे.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी म्हटले आहे की, जास्त हवा प्रदूषण असलेल्या देशांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. या देशांमध्ये अमेरिकेपेक्षाही हवेतील अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण पाच ते दहा पट अधिक आहे. हवा प्रदूषणाचा सामना करताना फुफ्फुसाचे आरोग्य बिघडत असते हे आता सर्वज्ञात असले तरी प्रदूषणाचा मूत्रपिंडावर होणारा परिणाम अभ्यासणारे फार कमी शोधनिबंध आहेत. रक्ताची गाळणी म्हणून मूत्रपिंडे काम करीत असतात त्यामुळे प्रदूषणाचा परिणाम मूत्रपिंडावरही होत असतो. दी अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी या संस्थेने याबाबत अमेरिकेच्या चार शहरातील १०,९९७ व्यक्तींच्या माहितीचे विश्लेषण केले असता  त्यात अनेक महत्त्वाच्या बाबी दिसून आल्या. १९९६-१९९८ ते २०१६ पर्यंतच्या काळातील ही माहिती होती. इंधन ज्वलन, औद्योगिक प्रक्रिया, नैसर्गिक स्रोत यातून सूक्ष्म कण बाहेर पडत असतात. ज्या रुग्णात अल्ब्युमिनुरिया हा मूत्रपिंडाच्या बिघडलेल्या कार्याशी  संबंधित जैविक घटक होता त्यांच्यावर हवा प्रदूषणाचा जास्त परिणाम झालेला होता. जगात मूत्रपिंडाचे रोग हे हवा प्रदूषणाशी निगडित आहेत. किंबहुना त्यामुळे या रोगांचा धोका जास्त असतो. मॅथ्यू ब्लम यांच्या मते जगात मूत्रपिंड विकार वाढत असताना हवा प्रदूषणापासून दूर राहण्याचा किंवा त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.