लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने नववर्षात आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन प्रचंड गदारोळ सुरू आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा विरोध सुरू असतानाच व्हॉट्सअ‍ॅपला आता अजून एक फटका बसलाय. व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेक युजर्स सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या अ‍ॅपचा वापर करण्याकडे वळले आहेत. सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेमध्ये तर प्रचंड वाढ झाली असून आता अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलीये. यासोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला असून कॅप्शनमध्ये ‘बघा तुम्ही काय केलं?’, अशा आशयाचं ट्विट केलं आहे. भारताशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँग काँग आणि स्विझर्लंड या देशांमध्येही सिग्नल टॉप डाउनलोड अ‍ॅप ठरलं आहे.

आणखी वाचा- Google वर दिसायला लागले WhatsApp चे प्रायव्हेट ग्रुप, सर्च करुन कोणीही होऊ शकतं जॉइन

एलन मस्क यांच्या ट्विटनंतर वाढली लोकप्रियता :
व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. अशात काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवर सिग्नल अ‍ॅप वापरण्याचं आवाहन केलं होतं. मस्क यांनी आपल्या 41.5 मिलियन फॉलोअर्सना सिग्नल वापरण्याचं आाहन केल्यापासून या अ‍ॅपच्या डाउनलोडिंगमध्ये वाढ झाली आणि लोकप्रियताही वाढली.

आणखी वाचा- प्रायव्हसी पॉलिसी रोखा किंवा Whatsapp-Facebook वर बंदी घाला, पत्राद्वारे व्यापाऱ्यांची सरकारकडे मागणी

काय आहे सिग्नलची खासियत :
सिग्नल अ‍ॅपद्ववारे तुमचा पर्सनल डेटा मागितला जात नाही किंवा स्टोअरही केला जात नाही. त्यामुळे हा डेटा कोणासोबत शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. सिग्नलवर फक्त तुमचा फोन नंबर स्टोअर केला जातो. ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि जुने मेसेज आपोआप गायब होण्याचं फिचरही यामध्ये आहे. याशिवाय सिग्नलची खासियत म्हणजे यात ‘डेटा लिंक्ड टू यू’ (Data Linked to You) फिचरही दिलं आहे. हे फिचर सुरू केल्यानंतर कोणीही चॅटिंग करताना चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमची चॅटिंग पूर्णतः सुरक्षित असते.