तुम्ही तुमची आर्थिक घडी कशापद्धतीने सांभाळता आहात हे कायमच अतिशय महत्त्वाचे असते. वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर आर्थिक गणिते जुळून येणे अतिशय आवश्यक असते. आजारपण, अपघात किंवा इतर कोणत्याही अडी-अडचणीच्यावेळी आणि घरातील एखादा समारंभ किंवा सहलीला जाण्यासाठीही अशाप्रकारची आर्थिक बचत फायदेशीर ठरते. कशाप्रकारे बचत केल्यास ती तुमच्या फायद्याची आहे. आणि तसे करत असाल तर तुम्ही आर्थिक साक्षर आहात असे तुम्ही समजू शकता.

१. तुम्ही अडी-अडचणींसाठी बचत करून ठेवली आहे. संकटे अनेक स्वरूपांत येऊ शकतात – नोकरी जाणे, अपघात, आजार, बांधकाम-दुरुस्ती इत्यादी. पण तुम्ही किमान सहा महिन्यांची मिळकत अशा संकटकाळासाठी वेगळी ठेवली आहे.

२. तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीतील फरक कळतो. तुम्ही आपला पैसा बँकेत राहू देत नाही. तुम्ही त्याची गुंतवणूक करून त्यापासून संपत्ती निर्माण करीत आहात.

३. तुम्ही अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे आर्थिक लक्ष्य ठरवलेले आहेत. प्रत्येक उद्दिष्टासाठी किती पैसा लागेल हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही केवळ स्वप्नं पाहत नाही  त्यांना पूर्ण करण्यासाठी सावकाश पुढे ही चालत आहात.

४. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरताना सावधगिरी बाळगता. तुम्हाला माहीत आहे की क्रेडिट कार्डावरील कर्ज किती महाग असते. म्हणूनच तुम्ही तुमच्या कार्डावरील शिल्लक वेळेवर आणि संपूर्ण परत करता. कारण तुम्हाला त्यावरील दंड, व्याजाचे दर आणि क्रेडिट स्कोरअरला होणारे नुकसान माहीत आहे.

५. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड त्याच्या मर्यादेपेक्षा २० ते ३० टक्के कमी वापरता. तुम्हाला माहीत आहे की, सारखी-सारखी क्रेडिट कार्ड मर्यादा गाठल्यामुळे कर्ज देणाऱ्यांसमोर तुमची प्रतिमा कर्जव्यसनी व्यक्ती म्हणून होते.

६. तुम्ही तुमचे ईएमआय वेळेवर भरता. तुम्ही तुमचे कर्ज थकीत होऊ देत नाही. दर महिन्याला ईएमआय वेळेवर भरण्यासाठी ईसीएस कामास येते.

७. तुम्ही विमा आणि गुंतवणूक यांना निराळे ठेवले आहे. तुम्हाला माहीत आहे की, पुरेसा विमा असण्यासाठी आणि चांगली गुंतवणूक करण्यासाठी या दोन्ही गोष्टी एकत्र यायला नको.

८. तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी विम्याची गरज माहीत आहे. तुमचे अकाली निधन झाल्यास तुमच्यावर आश्रितांना किती पैशांची गरज असेल याचा हिशेब तुम्ही करून ठेवलेला आहे.

९. तुम्ही टर्म पॉलिसी घेतली आहे. तुम्हाला माहीत आहे की, अशा प्रकारच्या पॉलिसीनेच तुम्ही नसताना तुमच्या मिळकतीची उणीव भरून निघते आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक हितांचे संरक्षण होऊ शकते.

१०. तुम्ही आरोग्यविमा घेतलेला आहे. तुमच्या कुटुंबाचे सर्व सदस्य या पॉलिसीत आहेत. कारण अचानकपणे येणाऱ्या दवाखान्याच्या मोठ्या खर्चाचा तुमच्या आर्थिक आरोग्यावर काय परिणाम होतो ते तुम्ही जाणता.

११. तुम्ही बजेट व्यवस्थित करता. महिन्याच्या सुरूवातीस बँकेत दिसणारी रक्कम तुम्हाला अवास्तव खर्च करण्यास प्रवृत्त करत नाही. तुम्ही आधी गरजा भागवता आणि मग चैन करता. कारण तुम्हाला गरज आणि चैन यातील फरक कळतो. आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी दोन्हीची काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला माहीत आहे.

आदिल शेट्टी, सीईओ, बँकबझार