निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर ओरड सुरू असताना या विषयावर अचूक मात्रा घेत सिक्कीमसारख्या एका छोटय़ाशा राज्याने संपूर्ण राज्यात केवळ ‘सेंद्रिय शेती’चे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या प्रकारची शेती करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
सिक्कीम हे ईशान्य भारतात हिमालयाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे राज्य. निसर्गसौंदर्याच्या या देणगीवरच या राज्याने पर्यटन क्षेत्रात मोठी झेप घेतली. ‘नेचर, कल्चर अ‍ॅण्ड अँडव्हेंचर’ हे ब्रीद घेऊन इथली अर्थव्यवस्था या पर्यटनावर उभी आहे. पण या पर्यटनाचा मुख्य स्रोत असलेल्या निसर्गाला गेल्या काही वर्षांमध्ये मोठा धोका उत्पन्न होऊ लागल्यावर या राज्याने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही नियम घालून घेतले. यातीलच एक पाऊल म्हणजे ‘सेंद्रिय शेती’चा प्रयोग.
सिक्कीम सरकारने १५ ऑगस्ट २०१० रोजी ‘सिक्कीम ऑरगॅनिक मिशन’ची घोषणा केली. शेती, शेतकरी, ग्राहक, समाज आणि निसर्ग-पर्यावरण या साऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी ‘सेंद्रिय शेती’ हे सूत्र ठरविण्यात आले. यासाठी जनजागृती, कृती कार्यक्रम आणि अंमलबजावणी अशी दिशा ठरवली गेली. सर्व सरकारी विभाग, स्वयंसेवी संस्था, कृषी संलग्न विभाग, बाजारपेठ आणि मुख्य म्हणजे शेतकरी यांची एकत्रित यंत्रणा उभी करण्यात आली. यामुळे गेल्या पाच वर्षांत सिक्कीममध्ये बहुतांश शेतीने आपल्या भाळी आता ‘सेंद्रिय’ हे बिरूद लावले आहे. ही वाटचाल डिसेंबरअखेर पूर्ण हेऊन त्या वेळी सिक्कीमची देशातील पहिले ‘सेंद्रिय राज्य’ म्हणून घोषणा होणार आहे.
कुठल्याही प्रकारची रासायनिक खते, औषधे, कीटकनाशकांच्या वापरावर र्निबध, पारंपरिक निसर्गपूरक शेती पद्धती, प्रदेशनिष्ठ पिकांचीच निवड, बाह्य़ घटकांचा कमीतकमी वापर ही या ‘सेंद्रिय’ पद्धतीची वैशिष्टय़े आहेत. इथल्या स्थानिक बाजारपेठेलाही या सेंद्रिय उत्पादित शेतीमालाचे नियम लावण्यात आलेले आहेत. या शेतीमालाचे ‘ब्रँडिंग’ करत त्याचे बाजारमूल्य वाढवण्यावरही सरकारने भर दिला आहे.
सर्वे सेंद्रिय: सन्तु!
शेती खर्चात बचत, बाजारपेठेशी जोडणी आणि वाढीव बाजारमूल्य यामुळे सिक्कीममधील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. समाजाला आरोग्यदायी शेती उत्पादन मिळू लागले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीमुळे निसर्ग-पर्यावरणाची आत्यंतिक काळजी घेतली जात आहे.

या पद्धतीतून आम्ही शेती, शेतकरी, समाज, आरोग्य, अर्थव्यवस्था आणि निसर्ग-पर्यावरण या साऱ्या घटकांमध्ये दुरुस्ती केली आहे. सिक्कीममध्ये सुरू झालेली ही चळवळ आता देशव्यापी होणे हे मानवजातीच्या हिताचे आहे.
– पवन चामलिंग, मुख्यमंत्री, सिक्कीम

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण