माणसाच्या मनातील विचारांचा थांगपत्ता लावणे आजपर्यंत विज्ञानाला शक्य झालेले नाही. मानसिक धक्का बसल्यानंतर एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले की, माणुस नक्की कधी काय करून बसेल याचा नेम नसल्याने विज्ञानाच्या मर्यादा आणखीनच स्पष्ट होताना दिसतात. मात्र, नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे, मानवी मनाचा अंदाज लावणे काही प्रमाणात शक्य होणार आहे. या संशोधनानुसार, साधी रक्ताची चाचणी करून माणूस आत्महत्या करणार की नाही याबद्दल अंदाज लावणे शक्य होणार आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील करण्यात आलेल्या प्रयोगात मानवी रक्तामध्ये असणाऱ्या जनुकांच्या रासायनिक स्थितीचा अभ्यास करून आत्महत्येविषयीच्या विचारांचा अंदाज बांधण्यात संशोधकांच्या प्रयत्नांना यश आले आहे. अत्यंत तणावाच्या परिस्थितीत रक्तातील एसकेए-२ या जनुकाच्या रचनांमध्ये होणाऱ्या बदलांवर या संपूर्ण प्रयोगादरम्यान लक्ष केंद्रित करण्यात आले होते. तणावाच्या स्थितीत जनुकांमध्ये होणारे बदल आणि या बदलांना मेंदूने दिलेला प्रतिसाद याबद्दल सातत्याने निरीक्षण करण्यात आले. मेंदूचे अनेक नमुने पडताळल्यानंतर आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये एसकेए-२चे प्रमाण अत्यंत खालावल्याचे दिसून आले.