-डॉ. मधुलिका म्हात्रे

एप्रिल आणि मे महिन्यात पडणाऱ्या कडक उन्हामुळे अंगाची झालेली लाहीलाही पावसाळा आला की हळूहळू नाहीशी होते. त्यामुळे पावसाळा हा अनेकांच्या आवडता ऋतू. चिंब पावसात भिजणं, ट्रेकिंगला जाणं अनेकांना आवडतं त्यामुळे अनेक जण हा पावसाळा एन्जॉय करतात. मात्र या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. कारण पावसाळा सुरु झाला की ओघाओघाने काही आजारपणदेखील येत असतं. अनेकांना पावसाळ्यात त्वचेसंबंधीत समस्या निर्माण होतात. त्यामुळे या समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही उपाययोजना आणि खबरदारी बाळगणं तितकंच गरजेचं आहे.

पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या सततच्या घामामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो. पावसात सर्वांत जास्त त्रास देणारा आजार म्हणजे त्वचाविकार. पावसात चिखलाच्या पाण्यातून चालल्यामुळे पायाला बुरशी संसर्ग होऊ शकतो. याशिवाय अस्वच्छ पाण्याच्या संपर्कात आल्यास त्वचाविकार होऊ शकतो. जे पाण्यात अधिक वेळ राहतात, पाय ओलसर ठेवतात, त्यांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. यात त्वचेला खाज उठणे, त्वचा लाल पडणे किंवा त्वचा फाटणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊयात या दिवसांमध्ये त्वचेच्या समस्यांपासून कशी सुटका करावी.

१. अनेकांना घरात कुंडीमध्ये झाडं लावण्याची आवड असते. मात्र काही झाडांमुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही झाडं घरात न ठेवता. बाल्कनीत किंवा गॅलरीत ठेवावी.

२. पाळीव प्राण्यांच्या सतत जवळ जाणं टाळा

३. आपली त्वचा हायड्रेट करा. आंघोळीनंतर एक चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम लावा, यामुळे आपल्या संवेदनशील त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार होतो आणि त्वचेला खाज येत नाही.

४.रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घ्या.

५. ओले कपडे घालू नका. त्यामुळे त्वचेवर खाज येते.

६.ओल्या चपला वापरू नका, यामुळे पायांच्या बोटांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो.

७. बाहेरून आल्यावर लगेच आंघोळ करा

८.हातापायाची नखे कापावीत, त्यात माती अडकल्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो.

९. जर तुम्हाला गंभीर पूरळ उठत असेल तर लवकरात लवकर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला.

( लेखिका डॉ. मधुलिका म्हात्रे या मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालय त्वचाविकार तज्ज्ञ सल्लागार आहेत.)