17 October 2019

News Flash

गाढ झोप न लागणे व्याधींचे लक्षण

ज्या वृद्ध व्यक्तींना गाढ झोप कमी मिळते, त्यांच्यात मेंदूतील प्रथिन टाउचे प्रमाण जास्त असते.

प्रातिनिधिक छायाचित्र

ज्या वृद्ध व्यक्तींना गाढ झोप कमी मिळते, त्यांच्यात मेंदूतील प्रथिन टाउचे प्रमाण जास्त असते. हे अल्झायमरचे आणि विचारक्षमतेचा ऱ्हास होत असल्याचे लक्षण आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’मधील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मंद तरंग झोप अर्थात ‘स्लो वेव्ह स्लीप’ म्हणून ओळखला जाणारा गाढ झोपेचा प्रकार हा स्मृतींचे एकत्रीकरण तसेच झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटण्यासाठी आवश्यक असतो. त्यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे ‘सायन्स ट्रान्सनॅशनल मेडिसीन’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार, उतारवयात चांगली झोप मिळत नसल्यास ते मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

याबाबत वॉशिंग्टन विद्यापीठातील सहायक प्राध्यापक ब्रेन्डन ल्युसे यांनी सांगितले की, विचारशक्ती कायम असलेल्या किंवा तिचा अल्प प्रमाणात ऱ्हास झालेल्या व्यक्तींमध्ये कमी झालेली गाढ झोप आणि टाउ प्रथिने यांचे व्यस्त प्रमाण आम्हाला आढळले, हे विशेष आहे. याचाच अर्थ कमी झालेली गाढ झोप (मंद तरंग झोपेची कमी झालेली प्रक्रिया) ही सर्वसाधारण निरोगी व्यक्तीला विचारक्षमता हरवण्याची व्याधी जडण्याआधीच्या संक्रमणावस्थेची निदर्शक असावी. एखाद्या व्यक्तीच्या झोपेचे मोजमाप हा अल्झायमर किंवा स्मृती आणि विचारक्षमताविषयक व्याधी होण्याआधी किंवा त्यांच्या पूर्वावस्थेतीची माहिती घेण्याचा मार्ग ठरू शकतो. विशेषत: अल्झायमर होण्याआधी मेंदूत होणारे बदल हे अत्यंत मंदपणे, कोणतीही चिन्हे न दिसता होत असतात.

First Published on January 11, 2019 12:55 am

Web Title: sleep disorders and problems