वॉशिंग्टन : झोपेच्या अत्यंत छोटय़ा समस्यांदेखील महिलांमध्ये उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतात असा इशारा संशोधकांनी दिला आहे. जवळपास एकतृतियांश प्रौढांना आवश्यक झोप मिळत नसून स्त्रियांसाठी ही समस्या मोठी असू शकते. निद्रेच्या समस्येचा महिलांना जास्त धोका असून पुरुषांहून दुप्पट महिलांना निद्रानाशाच्या समस्येला सामोरे जावे लागते.
सात ते नऊ तास झोप घेतल्यानंतरही ज्या महिलांना झोपेच्या समस्या असतात त्यांच्यांमध्ये रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. या अभ्यासामध्ये झोपेचा अभाव आणि झोपेच्या समस्यांमुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले असून ही गंभीर बाब असल्याचे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील ब्रुक अग्रवाल यांनी सांगितले.
नव्या अभ्यासामध्ये ३२३ महिलांचा रक्तदाब आणि निद्रेच्या सवयी तपासण्यात आला. महिलांमध्ये झोपमोड होणे, गाढ झोप न लागणे, झोप येण्यास जास्त वेळ लागणे आणि निद्रानाश या समस्या स्लीप अॅपनियासारख्या झोपेच्या गंभीर समस्येंहून तीनपटीने जास्त आहे. हृदयरोगाची शक्यता पडताळण्यासाठी काही महिलांनी संशोधकांना आपल्या हातातील रक्तवाहिनीमधील एंडोथेलियल पेशीचा अभ्यास करण्यास परवानगी दिली. या वेळी संशोधकांना एंडोथेलियल पेशीच्या आरक्ततेतील वाढ आणि झोपेच्या समस्या संबंधित असल्याचे आढळून आले. झोपेत अडथळा निर्माण करणाऱ्या समस्या हृदयरोग विकसित होण्यास कारणीभूत ठरू शकत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. याबाबत अधिक अभ्यास सुरू असून त्यांच्या निकालानंतर या परिणामांची पुष्टी होऊ शकणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 1:59 am