दररोज सात तास झोप घेतल्याने हृदय तरुण राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे हृदयासंबंधीचे रोग होण्याचा धोकादेखील कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. हा अभ्यास ‘स्लिप’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिवसातून सात तास झोपणाऱ्या प्रौढांमध्ये ‘एक्सेस हार्ट एज’ (ईएचए) कमी आढळून आल्याचे अभ्यासाच्या प्राथमिक परिणामांमध्ये म्हटले आहे. सात तासांहून अधिक किंवा कमी वेळ झोपल्याने ईएचएचे प्रमाण वाढल्याचे आढळले. तर याचे सर्वाधिक प्रमाण कमी वेळ झोपणाऱ्या लोकांमध्ये आढळून आले. ईएचएच्या माहितीमुळे झोपेच्या कालावधीचे हृदयासंबंधीच्या विकारांशी काय संबंध आहे, याचा अभ्यास करण्यास मदत होत आहे.

एखाद्या व्यक्तीच्या झोपण्याचा कालावधीचा हृदयासंबंधीच्या विकारांवर काय परिणाम होतो यासाठी या अभ्यासातील परिणाम महत्त्वाचे आहेत, असे अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील ज्युलिया डर्मर यांनी सांगितले. यामुळे हृदयासंबंधित विकार असणाऱ्या रुग्णांच्या उपचारात मदत होऊ शकते त्याचप्रमाणे भविष्यातील अभ्यासांमध्ये झोपेचे प्रमाण ग्राहय़ धरणाऱ्या संशोधकांनादेखील मदत होऊ शकते, असे डर्मर यांनी सांगितले. या अभ्यासासाठी ३० ते ७४ वयोगटातील १२,७७५ प्रौढांचा २००७ ते २०१४ या काळात अभ्यास करण्यात आला. यात सहभागी झालेल्या लोकांनी आपल्या झोपेच्या माहितीचे पाच श्रेणींमध्ये विभाजन करण्यात आले होते.