फक्त झोपण्याचाच जॉब मिळाला तर किती बरं होईल??? असा विचार तुम्हीही कधीतरी केला असेल. अनेकांना हवाहवासा असलेला हा ड्रीम जॉब आता सत्यात आलाय. ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढून पैसे कमवण्याची संधी देशातील एक कंपनी देत आहे. झोपाळू लोकांसाठी ही सुवर्णसंधी असून काम करण्याऐवजी ऑफिसमध्ये झोप काढण्याचे 1 लाख रुपये मिळणार आहेत.

दररोज नऊ तास झोप :-

भारतातील एका कंपनीने Sleep Internship सुरू केली आहे, म्हणजे तुम्हाला कामासाठी नव्हे तर फक्त झोपण्यासाठी स्टायपेंड दिला जाणार आहे. बंगळुरूतील वेकफिट (Wakefit)या गादी बनवणाऱ्या कंपनीने स्लीप इंटर्नशीप सुरू केली आहे. इंटर्नशिप दरम्यान तुम्हाला रोज नऊ तास झोपावं लागणार आहे. जर तुम्ही सलग शंभर दिवस हे करत राहिलात तर यासाठी तुम्हाला कंपनी एक लाख रुपये देणार आहे. या दरम्यान स्लीप एक्सपर्ट, आहारतज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञ यांचं मार्गदर्शनही ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे. यासोबत तुम्ही कसे झोपता आणि तुमच्या झोपेच्या पद्धतीकडं बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे.

पात्रतेसाठी कोणतीही डिग्री आवश्यक :-

या इंटर्नशीपसाठी तुमच्याकडे कोणतीही डिग्री असणं आवश्यक आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही या कंपनीने स्लीपिंग इंटर्नसाठी व्हॅकन्सी काढल्या होत्या. त्यावेळी जवळपास 1.7 लाख लोकांनी या इंटर्नशीपसाठी नोंदणी केली होती, त्यातील 23 जणांची कंपनीने निवड केली होती. आता पुन्हा एकदा कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. पण, हे काम मिळवण्यासाठी तुम्हाला झोप किती प्रिय आहे, हे कंपनीला पटवून द्यावं लागणार आहे. इंटर्नशिप प्रोग्राम दरम्यान कंपनी व्यक्तीच्या झोपेच्या पद्धतीकडं बारकाईने लक्ष ठेवणार आहे.