डॉ.अमोल देशमुख

झोप ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी, दैनंदिन गुणवत्तेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी चांगली झोप आवश्यक आहे. खाणे, पिणे आणि श्वास घेणे यांसारख्या मूलभूत कार्यांप्रमाणेच झोपही आपल्या शरीरासाठी तितकीच आवश्यक आहे. ऊर्जा संवर्धन, शरीराची सर्वांगीण वाढ, भावनांचे नियमन आणि रोगप्रतिकारक आरोग्य या अनेक कारणास्तव झोपेची आवश्यकता आहे.

झोप ही एक जटिल प्रक्रिया आहे, जी आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करते. जेव्हा आपण झोपी जातो, तेव्हा आपण झोपेच्या शृंखला (चरण १ आणि २) पासून खोल झोपेपर्यंत आणि नंतर डोळ्यांच्या जलद हालचाली हे झोपेचे टप्पे आहेत. झोपेच्या या टप्प्यातून यशस्वीरीत्या जाताना झोप आपले कार्य करते.

झोपेच्या अभावाच्या मुख्य परिणामामध्ये शारीरिक प्रभाव (थकवा, उच्च रक्तदाब), बौद्धिक परिणामांमध्ये प्रेरणेचा अभाव, एकाग्रता कमी होणे आणि बौद्धिक क्षमता कमी होणे, काम आणि ड्रायव्हिंगदरम्यान अपघाताची शक्यता आणि मानसिक आरोग्याच्या गुंतागुंती यांचा समावेश आहे. अपुरी विश्रांती विचार करण्याची क्षमता, ताणतणाव हाताळण्यासाठी, निरोगी रोगप्रतिकारक शक्ती राखण्याची क्षमता कमी करते. वजन वाढू लागते. पचनासंबंधी तक्रारी सुरू होतात, शरीरामध्ये सतत थकवा राहतो आणि कोणत्याही कामाचा उत्साह राहात नाही. उच्चरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह यांसारखे विकार उद्भविण्याचा धोकाही वाढतो. झोप न येणे हे चिंताविकार, नैराश्य, व्यसनाधीनता यांसारख्या अनेक मानसिक विकारांचे एक लक्षणसुद्धा असू शकते.

आपल्या मेंदूचे दिवस-रात्रप्रमाणे चालणारे जैविक घड्याळ आहे त्यास circadian rhythm म्हणतात. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होऊ  लागताच मेंदूतील पिनल ग्रंथीच्या साह्याने मेलंटोनिन नावाचे रसायन तयार करू लागतो. मेलंटोनिनमुळे आपण रात्रभर झोपू शकतो. सकाळी उजेड वाढल्यानंतर मेलॅटोनिन कमी होते आणि आपल्याला जाग येते.

निरोगी झोपेमुळे आपल्याला सकाळी ताजेतवाने झाल्याची भावना येते, दिवसा भरपूर ऊर्जा असते, दिवसभर चांगल्या मूडमध्ये असतो. झोपेविषयी चर्चा करताना काही महत्त्वाचे प्रश्न समोर येतात. झोप किती झाली? झोप समाधानकारक होती का? झोपेची गुणवत्ता झोपेच्या प्रमाणापेक्षा वेगळी असते. झोपेच्या प्रमाणात आपण प्रत्येक रात्री किती झोप घेतो हे मोजतो, तर झोपेची गुणवत्ता मोजताना झोप समाधानकारक आहे की नाही हे बघतो. खराब झोपेच्या सवयी, ताण, उदासीनता आणि चिंता, शारीरिक व्याधी, श्वसनक्रियेविषयी तक्रारी, निद्राविकार झोपेची गुणवत्ता कमी करतात. मोबाइल आणि गॅझेट्सच्या अतिवापरामुळे आजकाल सर्वच वयोगटात झोपेच्या समस्या वाढल्या आहेत.

निरोगी झोपेसाठी चांगल्या सवयीचे (Sleep hygiene)) अवलंब करणे आवश्यक आहे. झोपेचा एक नित्यक्रम असणे महत्त्वाचे आहे. आपले झोपेचे वेळापत्रक सेट करा, मंद संगीत, वाचन, ध्यानधारणेचा फायदा घ्या. झोपताना लख्ख प्रकाश टाळा, कारण ते मेलाटोनिनच्या उत्पादनास अडथळा आणू शकतात, मोबाइल, टीव्ही झोपायच्या वेळी टाळा, निरोगी दैनंदिन सवयी वाढवा, शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा, व्यायाम, योगासने करा, धूम्रपान, मद्यपान करू नका, संध्याकाळी चहा, कॉफीसारखी उत्तेजित करणारी पेये टाळा, संध्याकाळी हलके जेवण घ्या आणि उशिरा जेवणे टाळा, झोपण्याची जागा ठरावीक, नीटनेटकी आणि स्वच्छ असणे गरजेचे आहे. या गोष्टी अवलंबूनही समस्या निराकरण होत नसल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.