झोपेदरम्यान ज्या वेळी स्वप्ने दिसतात, ती ‘रॅपिड आय मूव्हमेंट (आरईएम) स्लीप’ स्मरणशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, असे उंदरांवर करण्यात आलेल्या नव्या अभ्यासात आढळले आहे.

नव्याने मिळालेली माहिती एकत्रित होण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणींमध्ये साठवली जाते हे आपल्याला आधीच माहीत आहे. मात्र, मेंदू ही प्रक्रिया कशारीतीने करतो हे आतापर्यंत अस्पष्ट होते. ‘आरईएम स्लीप’ ही उंदरांमध्ये सामान्य स्मरणशक्ती निर्माण होण्यासाठी महत्त्वाची आहे, हे आम्ही सिद्ध करू शकलो, असे कॅनडातील मॅकगिल विद्यापीठातील प्राध्यापक सिल्वेहन विल्यम्स यांनी सांगितले.

यापूर्वी करण्यात आलेल्या हजारो अभ्यासांमध्ये पारंपरिक प्रयोगाच्या पद्धती वापरून आरईएमच्या दरम्यान मज्जासंस्थेचे कार्य वेगळे करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. नव्या अभ्यासात, स्वित्र्झलडच्या बर्न विद्यापीठासह इतर संशोधकांनी अलीकडेच विकसित करण्यात आलेल्या ‘ऑप्टोजेनेटिक्स’ या तंत्रज्ञानाचा वापर केला. न्यूरॉन्सच्या समूहावर नेमकेपणाने लक्ष्य केंद्रित करून उजेडाच्या सहायाने त्याची हालचाल नियंत्रित करणे या तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञांना शक्य झाले आहे.

जागेपणी स्मृतींची निर्मिती होण्यात महत्त्वाचे असलेल्या  आणि ‘मेंदूची जीपीएस यंत्रणा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हिप्पोकॅम्पस’च्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी न्यूरॉन्सवर लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग आम्ही निवडला, असे विल्यम्स म्हणाले.

उंदरांची दीर्घकालीन स्मरणशक्ती तपासण्यासाठी वैज्ञानिकांनी मूषकांना ज्या ठिकाणी सारख्याच आकाराच्या आणि आकारमानाच्या दोन वस्तू आहेत, अशा नियंत्रित वातावरणात ठेवलेली नवी वस्तू शोधण्याचे प्रशिक्षण दिले. उंदरांनी उत्स्फूर्तपणे ओळखीची वस्तू शोधण्यापेक्षा नवी वस्तू शोधण्यास जास्त वेळ लावला. यातून त्यांची शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता दिसून आली.

मात्र हेच मूषक  ‘आरईएम स्लीप’मध्ये असताना संशोधकांनी त्यांच्या स्मृतीशी संबंधित न्यूरॉन्स लाईट पल्सेसच्या साहाय्याने बंद करून, त्याचा त्यांच्या आठवणी एकत्रित करण्यावर परिणाम होतो काय ते पाहिले. दुसऱ्या दिवशी, हेच उंदीर आदल्या दिवशी शिकलेल्या स्मृतीच्या मदतीने तेच काम करू शकले नाहीत, असे संशोधकांना आढळून आले.