सूक्ष्म प्लास्टिकचे पर्यावरणातील प्रमाण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याचा नव्याने आढावा घेण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच व्यक्त केली आहे. पेयजलातील सूक्ष्म प्लास्टिकचे अंश मिळत असल्याबद्दलचा अहवाल या संघटनेने नुकताच जाहीर केला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिकचे प्रदूषण कमी करावे, त्याचा मानवी वापर कमी करावा, असे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या पेयजलापासून सर्वत्र सूक्ष्म प्लास्टिक आढळून येत असून त्याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होत आहे, हे तातडीने माहीत करून घेण्याची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक आरोग्य घटक विभागाच्या संचालक डॉ. मारिया नीरा यांनी सांगितले की, पेयजलात सध्या आढळून आलेले सूक्ष्म प्लास्टिकचे प्रमाण लक्षात घेता त्यापासून मानवी आरोग्याला धोका असल्याचे दिसत नसले तरी, त्याविषयी अधिक जाणून घेण्याची गरज आहे. आता याबाबत मिळालेली माहिती ही मर्यादित आहे. जगभरातच प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचीही गरज आहे.

सूक्ष्म प्लास्टिकबाबत जाहीर झालेल्या अहवालात पेयजलातील त्याच्या अस्तित्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार १५० मायक्रोमीटरपेक्षा अधिक आकाराचे मायक्रो प्लास्टिक हे मानवी शरीरात शोषून घेतले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मानवी शरीरात जाणाऱ्या त्यापेक्षा कमी आकाराच्या मायक्रो प्लास्टिकचे प्रमाणही मर्यादित असणे अपेक्षित आहे. त्यासाठी पाण्यातील मायक्रो प्लास्टिीकचे प्रमाण मोजण्यासाठी प्रमाणित पद्धत, त्याचे स्रोत ओळखण्यासाठी अधिक अभ्यास आणि जलशुद्धीकरण प्रक्रिया सुधारणे आदी उपाय सुचविण्यात आले आहेत. पेयजल पुरवठादारांनी त्याच्यातील रोगजंतू नष्ट करण्याची प्रक्रिया केल्यास या पाण्यातील सूक्ष्म प्लास्टिकही काढले जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.