पार्किन्सन म्हणजे कंपवाताचा आजार असलेल्या रुग्णांच्या शारीरिक स्थितीची माहिती स्मार्ट फोटच्या मदतीने थेट डॉक्टरांना देण्यासाठी स्मार्ट ग्लोव्हज् तयार करण्यात आले आहेत. त्यात हाताची थरथर व बोटांच्या अवघडलेपणाची माहिती नोंदली जाईल. या ग्लोव्हज्च्या निर्मितीत एका भारतीय संशोधकाचाही हातभार लागला आहे. ऱ्होड्स आयलंड विद्यापीठाच्या वेअरेबल बायोसेन्सिंग टेक्नॉलॉजी या संस्थेतील कुणाल मंकोडिया यांनी सांगितले, की ग्लोव्हज, मोजे, कपडे व बूट याचे रूपांतर उच्च तंत्रज्ञानाधारित वस्तूत करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यातून लोकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पार्किन्सन म्हणजे कंपवाताच्या रुग्णांना हालचाली करणे अवघड जाते. त्यामुळे ते फार अंतर चालू शकत नाहीत. नवीन प्रकारचे ग्लोव्हज् स्मार्ट फोनला जोडले असल्याने रुग्णांच्या शारीरिक स्थितीची माहिती थेट डॉक्टरांना कळू शकेल. पक्षाघाताच्या रुग्णांसाठी मंकोडिया हे हातमोजे व पायमोजे तयार करीत आहेत. यात संवेदकांचा वापर करून डॉक्टर किंवा फिजीओथेरपिस्टना रुग्णांच्या स्थितीची माहिती मिळेल. गुडघे व घोटय़ाच्या हालचाली विशिष्ट प्रकारच्या मोजांनी (सॉक्स) टिपता येतील. कंपवाताच्या रुग्णांना हालचालीस मर्यादा असल्याने त्यांना नेहमी रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे काही वेळा अवघड असते. अशा परिस्थितीत स्मार्ट फोनला जोडलेले ग्लोव्हज् उपयोगी ठरणार आहेत.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)