18 February 2019

News Flash

सणासुदीच्या काळात असे ठेवा खर्चावर नियंत्रण

खर्च करताना त्याचे योग्य ते नियोजन केले तर ते डोईजड न होता आणि त्याचा ताण न येता ही प्रक्रिया आनंदाची होते आणि सणासुदीचा आनंदही लुटता

नवरात्र, दिवाळी हे सण आता अगदी तोंडावर आले आहेत. तेव्हा भेटवस्तू, कपडे, घरगुती सजावटीच्या वस्तू आणि इतर उपकरणांची खरेदी सुरू होईल. या सणांचा आनंद लुटायचा असेल तर खरेदी तर आलीच. पण हा खर्च करताना त्याचे योग्य ते नियोजन केले तर ते डोईजड न होता आणि त्याचा ताण न येता ही प्रक्रिया आनंदाची होते आणि सणासुदीचा आनंदही लुटता येतो. तेव्हा खरेदीची यादी कमी करण्याऐवजी खर्चावर नियंत्रण ठेवणे केव्हाही चांगले. पाहूयात खरेदीवर जास्त पैसे खर्च होऊ नयेत यासाठीच्या काही सोप्या युक्त्या…

ऑनलाईन खरेदीबाबत विचार करा

ई-कॉमर्समुळे सोयीनुसार खरेदी करता येते आणि त्याचबरोबर स्पर्धात्मक किमतींमुळे चांगले डीलही मिळू शकते. कपडे असोत किंवा उपकरणे, ऑनलाईन स्टोअर्समध्ये तुम्हाला घसघशीत सूट मिळेल, विशेषतः सणासुदीच्या वेळी. ई-वॉलेट आणि क्रेडिट कार्ड्सवर खरेदी केल्यास तुम्हाला आणखी पैसे वाचवता येतील. कारण क्रेडिट कार्ड/ ई-वॉलेट कंपन्यांसह टाय अप केलेले किरकोळ विक्रेते त्यांच्या वापरावर खास सवलत देऊ करतात.

मोठ्या किमतीच्या वस्तूंच्या किमतींची तुलना करा

एखादी वस्तू खरेदी करण्याचे ठरविण्यापूर्वी, किंमतीची तुलना करणाऱ्या साईट्स किंवा समीक्षकांद्वारे बाजारात उपलब्ध असलेल्या किमतींची तुलना करा, विशेषतः मोठ्या किमतीच्या वस्तूंबाबत किंमतीची तुलना करणाऱ्या साईट्स विशिष्ट उत्पादनासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही ठिकाणी उपलब्ध असलेली सर्वात कमी किंमत दाखवतात. तुम्ही फक्त उत्पादनाचा बारकोड स्कॅन करायचा असतो. किमतींबाबत ऑनलाईन चाललेल्या या स्पर्धात्मक वातावरणात ठराविक प्रसंगी प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करणे सुद्धा कधी कधी स्वस्त पडू शकते.

उधारी काळजीपूर्वकपणे करा

ठराविक बँका सणासुदीच्या काळांत शून्य प्रक्रिया शुल्क आकारतात आणि व्याज दरांवरही सूट देतात, अशावेळी तुम्ही ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि वाहने कर्जावर घेण्याबाबत विचार करू शकता. जर तुम्हाला लहानशी रक्कम उधार घ्यायची असेल तर, तुम्ही क्रेडिट कार्डांद्वारे खरेदी करू शकता. क्रेडिट कार्डे तुम्हाला ५५ दिवसांचा व्याज-मुक्त कालावधी देतात. क्रेडिट कार्डावरील खरेदीवर तुम्हाला कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉईंट्सही मिळवता येतात. तुम्ही ईएमआयचा पर्याय निवडूनही त्याचे बिल भरू शकता. व्यक्तिगत कर्ज घेण्यापूर्वी किंवा क्रेडिट कार्डावर खरेदी करण्यापूर्वी त्याची परतफेडीची योजना आखून ठेवा.

खरेदीची यादी बनवा आणि तिचे काटेकोर पालन करा

अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला कधी खरेदीच करायच्या नव्हत्या त्या उगाचच उधळपट्टी करून खरेदी केल्याने जास्त पैसे खर्च होतात. सवलत मिळाली म्हणून किंवा उगाच मोहात पडून खरेदी केल्यामुळे अनावश्यक खरेदी होते. ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करताना खरेदीची यादी आधीच तयार करून तिचे काटेकोर पालन करा आणि अनावश्यक खरेदीवर नियंत्रण ठेवा. तुमच्याकडे किती पैसे आहेत त्यानुसार प्रत्येक श्रेणीला ठराविक रक्कम ठरवून तुम्ही अशी यादी बनवू शकता.

स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू द्या

सणासुदीच्या दिवसांत भेटवस्तू आवश्यक असतात आणि तुमच्या नातेवाईकांना व मित्रांना तुम्ही भेटवस्तू देणारच. तथापि, महागड्या वस्तू खरेदी करण्याऐवजी, तुम्ही विचारपूर्वक काही गोष्टी तयार करू शकता. त्यामुळे त्या स्वस्तही मिळतील तसेच तुमच्या आप्तांना नेहमी लक्षात राहील की तुम्ही त्यांना विचारपूर्वक भेटवस्तू दिली आहे. उदाहरणार्थ, एखादे पेंटिंग बनवा, कुकीज बनवा किंवा काहीतरी हस्तकलेच्या वस्तू बनवा आणि त्या छानशा कागदांत गुंडाळून तुमच्या मित्रांना द्या.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार

First Published on October 9, 2018 7:23 pm

Web Title: smart shopping tips to control overspending during festive season