भावनिकदृष्टय़ा अस्थिर आणि चिंताग्रस्त व्यक्ती स्मार्टफोनच्या आहारी जात असल्याचा दावा नुकताच एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील डर्बी विद्यापीठ आणि नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठ यांनी स्मार्टफोनचा वापर आणि व्यक्तिमत्त्व यांच्यातील संबंध शोधण्यासाठी १३-६९ वयोगटातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ६४० व्यक्तींचा अभ्यास केला. जे लोक मानसिक तणावाखाली असतात ते स्मार्टफोनचा अतिवापर चिकित्सा म्हणून करतात. त्याचप्रमाणे स्मार्टफोनचा अतिवापर केल्यामुळे व्यक्तींना अधिक चिंता करण्याची सवय लागते, असेही या अभ्यासात आढळले आहे. जगभरात ४.२३ अब्ज स्मार्टफोन वापरले जातात. काही लोकांसाठी स्मार्टफोन ही त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजेची गोष्ट झाली आहे, असे डर्बी विद्यापीठातील प्राध्यापक जहीर हुसैन यांनी सांगितले.

लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात तणाव, चिंता, नैराश्य, कौटुंबिक अडचणी अशा प्रकारच्या अनेक  समस्या असतात. त्यामुळे ते भावनिकदृष्टय़ा अस्थिर होतात. तर या समस्यांपासून निसटण्यासाठी ते स्मार्टफोनचा अधिकाधिक वापर करतात, अशा प्रकारचे वर्तन चिंताजनक असल्याचे हुसैन यांनी म्हटले.

या अभ्यासामध्ये चिंता स्मार्टफोनच्या अतिवापराशी संबंधित असल्याचे आढळून आले. याआधी झालेल्या अभ्यासातदेखील स्मार्टफोनचा अतिवापर आणि चिंतेचे वाढते प्रमाण यामध्ये दुवा असल्याचा निष्कर्ष देण्यात आला होता. जे लोक आपल्या भावना उघडपणे मांडत नाही त्यांना अति स्मार्टफोन वापरण्याची समस्या असल्याचे अभ्यासात स्पष्ट केले आले. भावनिक स्थिरता ही मानसिक स्थिरता आणि संवेदनक्षमता यामुळे ठरते आणि आमच्या अभ्यासात भावनात्मकदृष्टय़ा अस्थिर असणे हे स्मार्टफोनच्या अतिवापराशी संबंधित आहे, असे हुसैन यांनी म्हटले.